रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा इस्रायलच्या पंतप्रधानांना लक्षवेधी संदेश

मॉस्को – ‘रशिया आणि इस्रायल ज्यूविरोध, तिरस्कार आणि वांशिक संघर्षाच्या विरोधात दृढपणे एकत्र उभे आहेत. त्याचबरोबर इतिहास खोटा ठरविण्याचा किंवा दुसर्‍या महायुद्धाचा निकाल उलटविण्याच्या प्रयत्नाविरोधातही रशिया व इस्रायल यांची एकजूट आहे’, असे रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी घोषित केले. इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांना पाठविलेल्या संदेशात रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दोन्ही देशांमधील सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले.

रशिया आणि इस्रायल यांच्यातील राजनैतिक सहकार्याला तीन दशके पूर्ण होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर, इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट येत्या शुक्रवारी रशियाचा दौरा करणार आहेत. त्याआधी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी इस्रायलच्या पंतप्रधानांना संदेश पाठविला असून त्याचे तपशील दोन्ही देशांच्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले. यामध्ये रशियन राष्ट्राध्यक्षांनी उभय देशांमधील ऐतिहासिक सहकार्याला उजाळा दिला. तसेच येत्या काळातील आव्हानांसाठी रशिया व इस्रायलने एकत्र येणे अतिशय आवश्यक असल्याचे राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले.

‘गेल्या काही दशकांमध्ये रशिया आणि इस्रायलने अनेक क्षेत्रांमध्ये फलदायी सहकार्याचा तसेच प्रमुख आंतरराष्ट्रीय समस्यांचे निराकरण करण्यासाठी केलेल्या भागीदारीतून बराच मोठा अनुभव कमावला आहे’, असे पुतिन यांनी म्हटले आहे. ‘आखातात शांती, सुरक्षा आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी रशिया व इस्रायलचे हितसंबंध एकमेकांसाठी पूरक ठरतील’, असे सूचक विधान रशियन राष्ट्राध्यक्षांनी केले. याआधी जून महिन्यात पंतप्रधान बेनेट यांनी इस्रायलची सूत्रे हाती घेतल्यानंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी त्यांना विशेष संदेश पाठविला होता. ‘येत्या काळात रशिया व इस्रायलला नाझीवादाचा पुरस्कार करणार्‍यांविरोधात तसेच ज्यूंचा वंशसंहार सुरू असताना, दुसर्‍या महायुद्धाच्या काळात सोव्हिएत रशियाच्या रेड आर्मीने दिलेले योगदान नाकारणार्‍यांच्या विरोधात लढा द्यायचा आहे’, असे रशियन राष्ट्राध्यक्ष म्हणाले होते.

रशियन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दशकांमध्ये रशियातील ज्यूविरोध मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी स्वीकारलेल्या कठोर भूमिकेमुळे हे घडल्याचा दावा केला जातो. पण रशियातील ‘लेव्हाडा सेंटर’ या अभ्यासगटाचे प्रमुख ऍलेक्सी लेव्हिन्सन यांनी गेल्या वर्षी याबाबत महत्त्वाचा इशारा दिला होता. ज्या दिवशी रशियात सत्ताबदल होईल किंवा पुतिन यांची भूमिका बदलेल, तेव्हापासून रशियातील ज्यूविरोध टोकाला जाईल, असे लेव्हिन्सन यांनी बजावले होते.

ज्यो बायडेन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी आल्यानंतर, अमरिकेच्या परराष्ट्र धोरणात फार मोठे बदल झाले. अमेरिकेने आता इराणधार्जिणी तसेच रशियाच्या विरोधातील प्रखर भूमिका स्वीकारलेली आहे. त्यावर प्रतिक्रिया उमटत असून इस्रायल, सौदी अरेबिया यांनी अमेरिकेला काटशह देण्यासाठी रशियाबरोबर सहकार्य वाढविले आहे. याचा लाभ घेऊन रशिया देखील आखाती क्षेत्रातील आपला प्रभाव योजनाबद्धरित्या वाढवित आहे. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी इस्रायलच्या नव्या पंतप्रधानांना दिलेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण संदेशाला ही पार्श्‍वभूमी लाभली असून यातून आखाती क्षेत्रातील राजकारणात होत असलेल्या फेररचना नव्याने समोर येत आहेत.

leave a reply