भारतात संधींचे विस्तीर्ण क्षेत्र खुले झालेले आहे

- अर्थमंत्री सीतारामन यांचा अमेरिकन उद्योगक्षेत्राला संदेश

वॉशिंग्टन – अमेरिकन उद्योगक्षेत्रासाठी संधींचे विस्तीर्ण क्षेत्र भारतात खुले झालेले आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. अमेरिकन उद्योगक्षेत्राला संबोधित करताना, अर्थमंत्री सीतारामन यांनी भारतात वेगाने विकसित होत असलेल्या उद्योगक्षेत्र व भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होत असलेल्या नव्या संधींी जाणीव करून दिली. त्याचवेळी कोरोनाच्या संकटातून जागतिक अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी कुठलाही भेदभाव न करता सर्वांना कोरोनाची लस मिळायला हवी, असे सीतारामन यावेळी म्हणाल्या.

भारतात संधींचे विस्तीर्ण क्षेत्र खुले झालेले आहे - अर्थमंत्री सीतारामन यांचा अमेरिकन उद्योगक्षेत्राला संदेशजी२० देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीसाठी अमेरिकेत दाखल झालेल्या अर्थमंत्री सीतारामन यांनी अमेरिकन उद्योजकांबरोबरील चर्चेत भारतात उपलब्ध असलेल्या संधींची माहिती दिली. आत्मनिर्भर भारत योजनेच्या अंतर्गत देशातील अर्थकारणाला चालना दिली जात असून यामुळे कित्येक नव्या क्षेत्रांमध्ये आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीला फार मोठा वाव मिळत असल्याचे सीतारामन यावेळी म्हणाल्या. विशेषतः पायाभूत क्षेत्रातील संधींचा यावेळी अर्थमंत्री सीतारामन यांनी विशेषत्त्वाने उल्लेख केला.

नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाईन तसेच पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना चालना देणारा ‘पीएम गतीशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन’, यांचा उल्लेख करून सीतारामन यांनी अमेरिकन उद्योजकांना भारतातील या प्रकल्पांची माहिती दिली. दरम्यान, ‘युएस इंडिया बिझनेस काऊन्सिल-युएसआयबीसी’च्या प्रतिनिधींशी यावेळी भारतीय अर्थमंत्र्यांची चर्चा पार पडली. कोरोनाची साथ ओसरल्यानंतर, भारतीय अर्थव्यवस्था करीत असलेल्या उत्तम कामगिरीची ‘युएसआयबीसी’ने प्रशंसा केली. युएसआयबीच्या अर्थमंत्र्यांबरोबरील या चर्चेत अमेरिकेच्या विमा, औषधनिर्मिती, तंत्रज्ञान, ऊर्जा तसेच भांडवली बाजाराशी निगडीत असलेल्या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

या सर्वांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या चढ्या आलेखाचे कौतूक केले असून पुढच्या काळातही भारतीय अर्थव्यवस्था अशीच कामगिरी करील, असा विश्‍वास या सर्वांनी व्यक्त केला. तसेच भारत आर्थिक आघाडीवर करीत असलेल्या सुधारणांमुळे पुढच्या काळात आर्थिक सहकार्य अधिकच वाढेल, अशी नोंद अमेरिकन उद्योजकांनी केली आहे.

leave a reply