पुढील सहा महिन्यात ‘लिथियम बॅटरी’चे १०० टक्के उत्पादन भारतातच होणार

नवी दिल्ली – ‘इलेक्ट्रिक व्हेईकल्स’ आर्थात ‘ई-वाहनां’साठी आवश्यक ‘लिथियम बॅटरी’ पुढील सहा महिन्यात भारतातच बनू लागतील. या जोरावर पुढील काळात भारत ई-वाहनांच्या निर्मिती क्षेत्रात जगात अव्वल स्थान पटकावेल, असा दावा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी यांनी केला आहे. एका व्हर्च्युअल परिषदेत बोलातान केंद्रीयमंत्री गडकरी यांनी हा विश्‍वास व्यक्त केला. दोन दिवसांपूर्वी गडकरी यांनी रायसेना डायलॉगमध्ये बोलताना जगातील आघाडीची ई-वाहनांची निर्मीती करणारी कंपनी ‘टेसला मोटर्स’ला भारतात लवकरात लवकर उत्पादन सुरू करण्याचे आवाहन केले होते.

भारतात ‘ई-वाहनां’साठी केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देत आहे. २०३० सालापर्यंत भारताच्या रस्त्यावर चास्तीत जास्त ई-वाहने धावू लागतील, असे लक्ष्य ठेवण्यात आले असून यामुळे अब्जावधी रुपयांच्या इंधनाचीही बचत होणार आहे. मात्र हे शक्य होण्यासाठी देशात ई-वाहनांसाठी आवश्यक असणार्‍या ‘लिथियम बॅटरी’चे उत्पादन आणि यासाठी लागणारा लिथियमचा पुरवठा महत्त्वाचा ठरणार आहे. या आघाडीवर भारत आतापर्यंत चीनवर अवलंबून होता. मात्र भारत आता ‘लिथियम ट्रँगल’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या अर्जेंटिना, चिली आणि बोलिव्हियाला सारख्या लॅटिन अमेरिकन देशांकडून लिथियम मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. तसेच भारतीय संशोधकांनी लिथियम बॅटरिजचे तंत्रज्ञानही विकसित केल्याच्या बातम्या होत्या.

या पार्श्‍वभूमीवर एका व्हर्च्युअल परिषदेत बोलताना आपण वाहन कंपन्यांना ‘फ्लेक्सीबल फ्युअल इंजिन’ बनविण्यासाठी प्रोत्साहीत करीत आहोत व यासंदर्भात वाहत निर्मिती कंपन्यांशी आपली अंतिम चर्चा झाली आहे, अशी माहिती केंद्रीयमंत्री गडकरी यांनी दिली. भारत ‘ई- वाहनां’च्या निर्मितीत आघाडी मिळविण्याच्या दिशेने जात आहे. नक्कीच यासाठी काही काळ लागेल. पण भारत येत्या काळात या आघाडीवर नंबर एक बनलेला असेल, असा विश्‍वास गडकरी यांनी व्यक्त केला. स्वदेशी बनावटीच्या बॅटरिजच्या तंत्रज्ञानामुळे आपण या आघाडीवर मोठी झेप घेऊ, असा दावा गडकरी यांनी केला.

भारताकडे यासाठी जबरदस्त क्षमता आहे. येत्या सहा महिन्यात देेशात १०० टक्के ‘लिथियम आयन बॅटरीज’ उत्पादन भारतातच होईल, असा ठाम विश्‍वास व्यक्त करताना यासाठी देशात ‘लिथियम’चा तुटवडा नसल्याचे केंद्रियमंत्र्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय भारत ‘हायड्रोजन फ्युअल सेल’ तंत्रज्ञानावरही काम करीत असून येत्या काळात पारंपरिक इंधनाच्या जागी याचा वापर केला जाईल. देशात दरवर्षी ८ लाख कोटी रुपयांचे इंधन तेल आयात केले जाते. ही मागणी येत्या चार ते पाच वर्षात दुप्पट होईल. याचा प्रचंड भार अर्थव्यवस्थेला सहन करावा लागेल. हे लक्षात घेतल्यास या पारंपरिक इंधनाच्या प्रभावी पर्यायांचा विचार महत्त्वाचा ठरेल, असे गडकरी यांनी अधोरेखित केले.

दरम्यान, केेद्रीयमंत्री गडकरी यांनी ‘टेसला मोटर्स’ला भारतात लवकरात लवकर वाहन निर्मिती सुरू करण्याचे आवाहन केले आहे. एलॉन मस्क यांच्या ‘टेसला मोटर्स’ने दोन महिन्यांपूर्वी भारतात आपल्या वाहनांची निर्मिती करण्यासाठी कर्नाटक सरकारबरोबर करार केला होता. मात्र भारतात ‘टेसला मोटर्स’ने वाहन निर्मितीचा निर्णय घेताच चीनने या कंपनीला रोखण्यासाठी त्यांच्यावर आरोप सुरू केले होते. चीनमध्ये ‘टेसला मोटर्स’चा कारखाना आहे.

leave a reply