अमेरिकेत कोरोनाव्हायरसच्या बळींची संख्या हजारावर

अमेरिकेत कोरोनाव्हायरसच्या बळींची संख्या हजारावर

वॉशिंगटन – गेल्या चोवीस तासांत कोरोनाव्हायरसने अमेरिकेत २४८ जणांचा बळी घेतला असून, या देशातील एकूण बळींची संख्या हजाराच्या पुढे गेली आहे. अमेरिकेचे न्यूयॉर्क शहर या साथीचे हॉटस्पॉट ठरत आहे. दरम्यान, कोरोनाव्हायरस हा ऋतुमानाप्रमाणे दाखल होणारा आजार असून काही महिन्यांनी आपल्याला पुन्हा या विषाणूचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा अमेरिकेतील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अँथनी फौकी यांनी दिला.

गेल्या तीन दिवसांत या विषाणूच्या बाधेने पाचशेहून अधिक जण दगावले आहेत. बुधवारी एकाच दिवसात जवळपास अडीचशे जण कोरोनाव्हायरसने दगावल्यानंतर अमेरिकन प्रशासन आणि आरोग्यव्यवस्थेवरचा ताण प्रचंड प्रमाणात वाढला आहे. एकट्या न्यूयॉर्कमध्ये ३०० जणांचा बळी गेला असून तीस हजार जण कोरोनाग्रस्त असल्याची माहिती समोर येत आहे. कोरोनाव्हायरसचा फैलाव लक्षात घेता, न्यूयॉर्क शहर हे अमेरिकेतील सध्याचे सर्वांत धोकादायक शहर असल्याचा दावा काही आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत.

सध्या अमेरिकेतील ६८,४८९ जण या विषाणूने संक्रमित झाले आहेत. या विषाणूचा फैलाव वाढू नये यासाठी आरोग्यसंस्था आणि अधिकाऱ्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आपल्या देशावर इटली आणि स्पेनसारखी परिस्थिती ओढवू नये, यासाठी आरोग्यविभागाने अतिरिक्त डॉक्टर्स, नर्सेस आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना इमर्जन्सीसाठी तयार राहण्याची सूचना केली आहे. तर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीच अमेरिकेतील आघाडीच्या कंपन्यांना वेन्टिलेटर्स आणि वैद्यकीय साहित्याच्या निर्मितीचे आदेश दिले आहेत.

या कोरोनाव्हायरसला रोखण्यासाठी कितीही उपाययोजना केल्या, तरी प्रतिबंधात्मक लस शोधणे आवश्यक असल्याचे अमेरिकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अँथनी फौकी यांनी सुचविले आहे. हा एक ऋतुमानाप्रमाणे येणारा विषाणू असून पुढच्या काही महिन्यांनी परत येईल; त्याआधी आपण लस शोधणे अनिवार्य असल्याचे डॉ. फौकी म्हणाले. अमेरिकेतील शास्त्रज्ञांचे पथक या विषाणूची लस शोधण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

दरम्यान, या विषाणूचा सामना करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जाहीर केलेला १.८ ट्रिलियन डॉलर्सचा निधी सिनेटने मंजूर केला आहे. यामुळे कोरोनाने बाधित अमेरिकेतील छोट्या उद्योगांना तसेच कर्मचाऱ्यांना मोठे सहाय्य मिळणार आहे. पण या महामारीचा सामना करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने दिरंगाई केल्याची टीका मायक्रोसॉफ्टचे माजी अध्यक्ष बिल गेट्स यांनी केली.

leave a reply