हमासविरोधातील 11 दिवसांचा संघर्ष हा इस्रायलच्या मोहिमेचा पहिला टप्पा

- इस्रायलच्या वरिष्ठ अधिकार्‍याचा इशारा

तेल अविव – ‘गाझातील हमासविरोधात सुरू केलेल्या व्यापक लष्करी मोहिमेचा पहिला टप्पा पूर्ण झाला. पण परिस्थिती पुन्हा बिघडली तर या मोहिमेचा पुढचा टप्पा सुरू होऊ शकतो’, असा इशारा इस्रायली लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिला. याआधी हमासच्या नेत्याने संघर्षबंदीबाबत इस्रायलसह लिखित करार झालेला नाही व आपली बोटे रॉकेट्सच्या ट्रिगरवर असल्याचे धमकावले होते. त्यामुळे 11 दिवसांच्या संघर्षानंतर इस्रायल आणि हमासमध्ये संघर्षबंदी लागू झाली असली तरी ती फार काळ टिकणार नसल्याचे संकेत दोन्ही गटांकडून दिले जात आहेत.

हमासविरोधातील 11 दिवसांचा संघर्ष हा इस्रायलच्या मोहिमेचा पहिला टप्पा - इस्रायलच्या वरिष्ठ अधिकार्‍याचा इशाराइस्रायलच्या सदर्न कमांडचे प्रमुख मेजर जनरल एलिझर टॉलेडॅनो यांनी स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना इस्रायलचे लष्कर गाझातील दहशतवादी संघटनांविरोधात व्यापक कारवाईसाठी सज्जता असल्याचे जाहीर केले. ‘गाझातील दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्याची संधी दर आठवड्याला किंवा महिन्याला मिळत नाही. कारण त्याचा आपल्याच जनतेवर मोठा ताण येऊ शकतो. म्हणून जेव्हा कधी या दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई सुरू होते, त्यावेळी मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन या संघटनांवर जोरदार हल्ले केले जातात’, असे मेजर जनरल टॉलेडॅनो म्हणाले.

‘12 व्या दिवशी व त्यानंतरही हमासच्या ठिकाणांवरील हल्ले सुरू ठेवण्याची आम्ही तयारी केली होती. पण इस्रायली जनतेच्या सुरक्षेचा विचार करून हमासविरोधी कारवाई मर्यादित ठेवावी लागली. असे असले तरी ही लष्करी मोहीम पुढच्या काळात सुरू करण्यासाठी इस्रायलचे लष्कर आजही पूर्ण सज्ज आहे’, असे मेजर जनरल एलिझर टॉलेडॅनो म्हणाले. इस्रायलच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, या पहिल्या टप्प्यातील कारवाईत इस्रायलने गाझातील हमास, इस्लामिक जिहाद व इतर दहशतवादी संघटनांच्या जवळपास 1,500 ठिकाणांवर हवाई हल्ले चढविले होते. तर हमासने इस्रायलवर 4,300 हून अधिक रॉकेट हल्ले चढविले.

हमासविरोधातील 11 दिवसांचा संघर्ष हा इस्रायलच्या मोहिमेचा पहिला टप्पा - इस्रायलच्या वरिष्ठ अधिकार्‍याचा इशाराहमासचे बहुतांश रॉकेट हल्ले इस्रायलच्या हवाई सुरक्षा यंत्रणांनी यशस्वीरित्या भेदले. आत्तापर्यंत इस्रायल आणि हमासमध्ये पेटलेल्या इतर संघर्षापैकी गेल्या महिन्यातील संघर्ष सर्वात भीषण होता, असा दावा केला जातो.

याआधी 2009 आणि 2014 साली झालेला संघर्ष काही आठवडे चालला होता. तसेच त्या संघर्षांमध्ये मोठी जीवितहानी झाली होती. या तुलनेत 11 दिवसांच्या संघर्षात हमासचे दहशतवादी मोठ्या संख्येने ठार केल्याचे तसेच हमासची जबर आर्थिक हानी केल्याचा दावा इस्रायल करीत आहे. त्यामुळे गेल्या महिन्यातील संघर्ष सर्वात भीषण होता, असा दावा केला जातो.

दरम्यान, 11 दिवसांचा इस्रायलबरोबरील संघर्ष म्हणजे युद्धाचा सराव होता, अशी धमकी हमासचा प्रमुख याह्या सिन्वरने दिली आहे. तसेच इस्रायलच्या महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी आपल्याकडे प्रचंड प्रमाणात क्षेपणास्त्रे असल्याचा दावा हमास करीत आहे. तर 11 दिवसांचा हमासबरोबरील संघर्ष म्हणजे जगातील पहिले आर्टिफिशल इंटेलिजन्सद्वारे लढलेले युद्ध होते, असे इस्रायलच्या लष्करी अधिकार्‍यांनी म्हटले आहे. त्यामुळे हा संघर्ष पुढच्या घनघोर युद्धाच्या तयारीचा भाग असल्याचे संकेत इस्रायल व हमासही देत आहे. त्या संघर्षाचा भडका कुठल्याही क्षणी उडू शकतो, यावरही इस्रायल व हमासचे एकमत असल्याचे दिसते.

leave a reply