येमेनी लष्कर व हौथींमधील संघर्षात 111 जण ठार – हौथी बंडखोरांचे सौदीवर ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले सुरू

सना – गेल्या तीन दिवसांपासून येमेनचे लष्कर आणि हौथी बंडखोरांमध्ये पेटलेल्या संघर्षात 111 जण ठार झाले. येमेनमधील इंधनसंपन्न मरिब या भागावर ताबा मिळविण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षात हा भीषण रक्तपात झाला. गेल्या चार महिन्यांपासून हौथी बंडखोर मरिबवर हल्ले चढवित आहेत. त्याचबरोबर येमेनमधील हादी सरकार आणि लष्कराला पाठिंबा देणार्‍या सौदी अरेबियावरही हौथी बंडखोरांनी ड्रोन व क्षेपणास्त्रांचे हल्ले सुरू ठेवले आहेत. गेल्या चोवीस तासात हौथींनी सौदीवर प्रत्येकी चार ड्रोन व क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविले.

111 जण ठारसहा वर्षांपासून येमेनमधील इराणसंलग्न हौथी बंडखोरांनी येथील सौदी समर्थक हादी सरकारविरोधात संघर्ष पुकारला आहे. अन्सरुल्ला हौथी या नेत्याच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेल्या येमेनमधील बंडखोरांनी राजधानी सनावर नियंत्रण मिळवून आपले सरकार प्रस्थापित केले. तर सौदी समर्थक हादी यांचे सरकार येमेनची आर्थिक राजधानी आणि प्रमुख बंदर शहर एडनमधून आंतरराष्ट्रीय संघटनांची मान्यता असलेले सरकार चालवित आहेत. त्यामुळे गेले काही वर्षे येमेनमध्ये दोन समांतर सरकार परस्परविरोधी कारभार करीत आहेत.

हौथी बंडखोरांनी येमेनच्या प्रमुख शहर आणि बंदरांवर ताबा मिळविला असला तरी मरिबसारखे इंधनसंपन्न शहर अजूनही हादी सरकारच्या नियंत्रणाखाली आहे. या शहराचा ताबा घेण्यासाठी हौथी बंडखोरांकडून फेब्रुवारी महिन्यापासून हल्ले सुरू केले. यामध्ये दोन्ही गटांचे शेकडो जण ठार झाल्याचा दावा केला जातो. गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा एकदा हौथी बंडखोरांनी मरिब शहरावर हल्ले सुरू केले. यामध्ये येमेनी लष्कराचे 29 जवान तर 82 हौथी बंडखोर ठार झाले. याशिवाय हौथी बंडखोरांनी येमेनच्या इतर भागातही लष्करावर हल्ले चढविले.

111 जण ठारमरिबवर नियंत्रण मिळविले तर सौदी अरेबिया, अरब मित्रदेश आणि आंतरराष्ट्रीय समुदायाबरोबर वाटाघाटी करताना अधिक सोपे होईल, असे हौथी बंडखोरांना वाटत आहे. पण मरिबचा ताबा घेण्यासाठी हौथी बंडखोरांकडून केल्या जाणार्‍या हल्ल्यांवर आंतरराष्ट्रीय स्तरातून चिंता व्यक्त केली जाते. गेल्या सहा वर्षांमधील संघर्षात विस्थापित झालेल्या सुमारे 10 लाख येमेनी नागरिकांना मरिब शहरातील शिबिरात वसविण्यात आले आहे. या संघर्षामुळे सदर शिबिरातील विस्थापितांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्‍न निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जाते.

दरम्यान, येमेनमधील सरकार आणि हौथी बंडखोरांमधील गृहयुद्ध म्हणजे सौदी अरेबिया आणि इराणमधील छुपा संघर्ष असल्याचे मानले जाते. या संघर्षात आत्तापर्यंत हजारो जणांचा बळी गेला तर लाखो जण विस्थापित झाले आहेत. त्यातच इराणमध्ये रईसी हे जहालमतवादी नेते राष्ट्राध्यक्षपदावर येत असून त्यांनी आखातातील इराणसमर्थक संघटनांना अधिक बळ पुरविण्याचे संकेत दिले आहेत. आत्तापर्यंत इराण छुप्यारितीने हौथी बंडखोरांना सौदी व सौदीच्या मित्रदेशांविरोधात सहाय्य पुरवित होता. पण रईसी यांच्या कार्यकाळात इराण अधिक आक्रमकतेने हौथी बंडखोरांना सहाय्य करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे येमेनमधील संघर्ष कमी होण्याऐवजी याची तीव्रता वाढेल. त्याचे पडसाद उमटू लागले असून हौथी बंडखोरांनी मरिबचा ताबा घेण्यासाठी चढविलेला हल्ला याचेच संकेत देत आहे.

leave a reply