कोरोनासंदर्भातील ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’च्या अहवालावर १४ देशांचा आक्षेप

वॉशिंग्टन/जीनिव्हा – ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने (डब्ल्यूएचओ) जगभरात फैलावलेल्या कोरोना साथीबाबत दिलेल्या अहवालावर जगातील आघाडीच्या देशांनी तीव्र आक्षेप नोंदविले आहेत. अमेरिका, जपान, इस्रायलसह १४ देशांनी यासंदर्भात संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले आहे. यात कोणताही हस्तक्षेप व दबावाविना कोरोनाच्या उगमाची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. त्याचवेळी ‘डब्ल्यूएचओ’चे महासंचालक टेड्रॉस घेब्रेस्यूस यांनी चीनने आरोग्य संघटनेच्या पथकाला पूर्ण माहिती दिली नसल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे.

गेल्या वर्षाच्या सुरुवातीला कोरोनाची साथ फैलावण्यास सुरुवात झाल्यानंतर जगभरातील प्रमुख देशांनी चीनमध्ये तातडीने पथक पाठवून चौकशी करावी, अशी मागणी केली होती. मात्र चीनने कोरोनाची सुरुवात आपल्याकडे झालेलीच नाही, असे सांगून चौकशीला परवानगी नाकारली होती. आंतरराष्ट्रीय समुदायाने दबाव वाढविल्यानंतर ‘डब्ल्यूएचओ’ला आंतरराष्ट्रीय चौकशीचा प्रस्ताव मान्य करणे भाग पडले होते. त्यानुसार जानेवारी महिन्यात आरोग्य संघटनेचे पथक चीनमध्ये दाखल झाले होते. या पथकाचा अहवाल मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला.

या अहवालात, कोरोनाची साथ चीनच्या वुहान शहरातील ‘सीफूड मार्केट’मधून पसरली असावी, असे सांगण्यात आले आहे. चीनच्या वुहान लॅबमधून विषाणूचा प्रसार झाल्याची शक्यता अत्यंत धूसर असल्याचे अहवालात म्हटले आहे. अहवाल तयार करणार्‍या पथकाचे प्रमुख पीटर एम्बारेक यांनी, कोरोनाची साथ वुहान शहरात ऑक्टोबर २०१९ पासूनच फैलावण्यास सुरुवात झाली असावी, असाही दावा केला आहे. मात्र ‘डब्ल्यूएचओ’च्या या अहवालावर आंतरराष्ट्रीय स्तरावरून तीव्र टीका होत आहे.

अमेरिकेसह १४ देशांनी या अहवालावर आक्षेप घेणारे संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात ऑस्ट्रेलिया, जपान, इस्रायल, ब्रिटन, कॅनडा, दक्षिण कोरिया, झेक रिपब्लिक, डेन्मार्क, नॉर्वे, इस्टोनिया, लाटव्हिया, लिथुआनिया व स्लोव्हेनिया या देशांचा समावेश आहे. त्यात कोरोनाच्या उगमाची स्वतंत्र, निष्पक्ष व पारदर्शक चौकशी व्हावी अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’चे महासंचालक घेब्रेस्यूस यांनी, आरोग्य संघटनेच्या पथकाला पूर्ण माहिती मिळविण्यात अडचणी आल्याची कबुली देऊन कोरोनाच्या प्रसाराबाबत अजून चौकशी व्हायला हवी, असे वक्तव्य केले आहे.

१४ आघाडीच्या देशांनी घेतलेले आक्षेप व महासंचालकांनी केलेले वक्तव्य यामुळे कोरोना साथीबाबत चीनच्या भूमिकेबाबतचा संशय अधिकच बळावल्याचे दिसत आहे.

leave a reply