अरब देशांच्या कारवाईत १५६ हौथी ठार

- १९ दिवसात ५५० हौथी बंडखोर ठार केल्याचा दावा

१५६ हौथीसना – सोमवारी सौदी अरेबिया व अरब मित्रदेशांच्या लढाऊ विमानांनी येमेनच्या मारिब प्रांतात चढविलेल्या हवाई हल्ल्यात १५६ हौथी बंडखोरांना ठार झाले. गेल्या आठवड्यात सौदी अरेबियाच्या प्रवासी विमानतळावर ड्रोन हल्ले चढविणार्‍या हौथी बंडखोरांना अरब देशांनी या कारवाईद्वारे उत्तर दिल्याचे बोलले जाते. याबरोबर गेल्या १९ दिवसात येमेनमधील संघर्षात किमान साडेपाचशे हौथी बंडखोरांना संपविल्याचा दावा अरब मित्रदेशांची आघाडी करीत आहे.

येमेनमधील हादी सरकारचे समर्थक सौदी अरेबिया व हौथी बंडखोरांचे सहाय्यक इराण यांच्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. गेल्या आठवड्यात इराकच्या मध्यस्थीने सौदी व इराणच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीतील सर्वच तपशील माध्यमांसमोर प्रसिद्ध केलेले नाहीत. पण यामध्ये येमेनमधील गृहयुद्धाचा देखील समावेश होता, असा दावा केला जातो.

पण ही चर्चा सुरू असताना हौथी बंडखोरांनी मारिबचा ताबा घेण्यासाठी हल्ले तीव्र केले आहेत. इंधनाचा मोठा साठा असलेल्या मारिबवर नियंत्रण मिळविले तर येमेनचा पूर्ण ताबा मिळेल, याची जाणीव झालेले हौथी बंडखोर गेली काही महिने मारिब शहरावर जोरदार हल्ले चढवित आहेत. त्याचबरोबर राष्ट्राध्यक्ष हादी यांच्या सरकारला समर्थन देणार्‍या सौदी अरेबियातील नागरी तसेच लष्करी ठिकाणांना देखील हौथी बंडखोरांनी लक्ष्य केले आहे.

येमेनचे लष्कर आणि अरब मित्रदेशांची आघाडी हौथी बंडखोरांचे हल्ले हाणून पाडत आहे. सोमवारच्या कारवाईत मारिबमधील अब्दिया येथील हौथी बंडखोरांच्या ३३ ठिकाणांवर हल्ले चढविले. या हल्ल्यांमध्ये १५६ बंडखोरांना संपविण्यात यश मिळाल्याचे अरब देशांच्या आघाडीने म्हटले आहे. एका दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने हौथी बंडखोर ठार होण्याची गेल्या दोन महिन्यातील पहिली घटना ठरते. गेल्या १९ दिवसात येमेनचे लष्कर व अरब देशांच्या आघाडीने हौथींच्या ठिकाणांवर ३३८ हल्ले चढविले.

१५६ हौथी२०१४ साली हौथी बंडखोरांनी येमेनमधील हादी सरकारविरोधात लष्करी संघर्ष सुरू केला. २०१५ साली सौदी अरेबिया, युएई, कतार, बाहरिन, इजिप्त व सुदान या देशांनी एकत्र येऊन हौथी बंडखोरांविरोधात कारवाई सुरू केली. या संघर्षात दोन लाख ३३ हजारांहून अधिक जणांचा बळी गेल्याचा दावा केला जातो. या संघर्षामुळे येमेनमध्ये किमान ८४ हजार जणांचा भूकबळी गेला. तर ३१ लाखांहून अधिक जण विस्थापित झाले आहेत.

हौथी बंडखोरांनी राजधानी सनासह मोठ्या भूभागाचा ताबा घेतला आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष हादी यांना एडन बंदरात आपले सरकार हलवून इथून कारभार करावा लागत आहे. हौदेदा या बंदर शहरावर देखील हौथी बंडखोरांचे नियंत्रण आहे. अशा परिस्थितीत मारिबसारखे इंधनसंपन्न शहर हौथींच्या ताब्यात गेले तर पूर्ण येमेनवर हौथींची सत्ता येईल. असे झाले तर रेड सी व एडनच्या आखातातून होणार्‍या सागरी वाहतुकीवर इराणसमर्थक हौथींचे नियंत्रण येण्याची शक्यता आहे.

या पार्श्‍वभूमीवर, मारिबच्या सुरक्षेसाठी सौदी व अरबमित्रदेश हौथींवर जोरदार हवाई हल्ले चढवित असल्याचे दिसते.

leave a reply