चोवीस तासात देशात कोरोनाचे १७५२ नवे रुग्ण

नवी दिल्ली – देशात कोरोनाव्हायरसमुळे दगावलेल्यांची संख्या ७२३ वर पोहोचली असून चोवीस तासात १७५२ नवे रुग्ण देशभरात आढळले. यामुळे देशातील रुग्णांची संख्या २३,४५२ झाली असल्याची महिती आरोग्य मंत्रालयातर्फ़े देण्यात आली. देशात एका दिवसात आढळलेली कोरोनाव्हायरसची ही आतापर्यँतची सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. तसेच शुक्रवारी रात्रीपर्यंत रुग्णांची संख्या २४००० च्याही पुढे गेल्याची माहिती समोर येत आहे.

देशात कोरोनाव्हारसच्या रुग्णांची संख्या वाढत असताना काही समाधानकारक बातम्याही समोर येत आहेत. देशातील ८० जिल्ह्यांमध्ये गेल्या १५ दिवसात एकही नवा रुग्ण आढळलेला नाही, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तसेच निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी देशात या साथीच्या रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा काळ ७.५ दिवसांवरून आता १० दिवसांवर पोहोचल्याचा दावा केला आहे. तत्पूर्वी शुक्रवारी सकाळी हर्ष वर्धन यांनी विविध राज्यांच्या मुखमंत्र्यांशी संवाद साधला. यानंतर त्यांनी देशात या साथीचे रुग्ण बरे होण्याचा दर हा जगाच्या तुलनेत चांगला असल्याचा दावा केला. ४,२१७ रुग्ण आतापर्यंत उपचारानंतर बरे झाले असून हा दर २० टक्के असल्याचे हर्ष वर्धन म्हणाले.

महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोनामुळे १८ रुग्ण दगावले, तर ३९४ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील या साथीच्या रुग्णांची संख्या ६,८१७ झाली आहे. मुंबईतच ११ जणांचा या साथीमुळे मृत्यू झाला, तर ३५७ नव्या रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत राज्यात या साथीने ३१० जण दगावले आहेत. शुक्रवारी महाराष्ट्रानंतर गुजरातमध्ये सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद झाली. या राज्यात एका दिवसात १५ जण दगावले, तर १९१ नवे रुग्ण आढळले. तामिळनाडूत ७७ नव्या रुग्णांची नोंद झाली. तामिळनाडूतील चेन्नईबरोबर मदुराई, कोईम्बतूर ही शहरे नवे हॉटस्पॉट म्हणून समोर येत आहेत. तेलंगणात हैदराबादमध्येही रुग्णांची संख्या सतत वाढत आहे.

त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने गुजरातमधील अहमदाबाद, सुरत बरोबर तामिळनाडूत चेन्नई आणि तेलंगणात हैदराबादमध्ये केंद्रीय पथक पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी महाराष्ट्रात मुंबई, पुणे या रेड झोनसह देशातील एकूण सहा राज्यात केंद्रीय पथके पाठविण्यात आली आहेत.

leave a reply