डिसेंबरपर्यंत भारतात लसींचे २०० कोटी डोस उपलब्ध होतील – नीति आयोगाच्या सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांची माहिती

सर्वांना लस उपलब्ध व्हावी यासाठी लस निर्मिती करणार्‍या परदेशी कंपन्यांबरोबर चर्चा सुरू आहे. नव्या धोरणाअंतर्गत ‘एफडीए’ आणि ‘डब्ल्यूएचओ’ने मान्यता दिलेल्या कोणत्याही लसींना भारतात आयात केले जाऊ शकते. यासाठी आयात परवान्यांनाही दोन दिवसात मंजुरी देण्यात येणार आहे. तसेच पुढील आठवड्यापासून रशियाची ‘स्पुटनिक व्ही’ लसीकरणासाठी उपलब्ध होणार आहे.

नवी दिल्ली – ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंतच्या कालावधीत सर्व भारतीयांचे लसीकरण होऊ शकेल इतके डोस भारतात उपलब्ध होतील. देशी आणि परदेशी कंपन्यांकडून सुमारे दोन अब्ज लसींचा पुरवठा झालेला असेल. त्यामुळे भारतात सर्वांचे लसीरकण पुर्ण होण्यास कोणतेही अडथळे राहणार नाहीत. यासाठी निरनिराळ्या कंपन्यांबरोबर चर्चा सुरू असल्याची माहिती, नीति आयोगाच्या सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली आहे.

लसींचे, उपलब्ध, डॉ. व्ही. के. पॉल, नीति आयोग, लस निर्मिती, भारत, एनटीएजीआयभारतात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने हाहाकार उडविला असताना तिसर्‍या लाटेचाही सामना करावा लागेल, असा इशारा तज्ज्ञ देत आहेत. मात्र ही तिसरी लाट थोपवायची असेल व पुढील काळात कोरोनाचे हे संकट दूर सारायचे असेल, तर लसीकरण हाच उपाय आहे, असेही तज्ज्ञ स्पष्ट करीत आहेत. भारतात सध्या लसींचे सुमारे साडे सतरा कोटी लस देण्यात आल्या आहेत. जगात सर्वाधिक जलदगतीने भारतात लसीकरण होत आहे. मात्र भारताची लोकसंख्या आणि सध्या उपलब्ध असलेल्या दोन कंपन्यांच्याच लसीचा पर्याय पाहता लसीकरणाचा वेग आणखी वाढविण्यावर मर्यादा येत आहेत. राज्यांकडून लसींचा तुटवडा असल्याच्या तक्रारी येत आहे. हा तुटवडा कधी दूर होईल? तसेच सरकार कोव्हॅक्सिन लस बनविण्यासाठी इतर कंपन्या व संस्थांना परवानगी का देत नाही? यासारखे प्रश्‍नही विचारले जात आहेत. या सर्व प्रश्‍नांची उत्तरे डॉ. पॉल यांनी गुरुवारी दिली.

भारतात ४५ वर्षांवरील एक तृतियांश नागरिकांना आतापर्यंत लसीचा पहिला डोस किंवा दोन्ही डोस मिळाले आहे. भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये ४५ वर्षांवरील ८८ टक्के नागरिकांचा समावेश आहे. यामुळे या वयोगटातील लसीकरणाचा हा आकडा महत्त्चाचा ठरतो, याकडे डॉ. पॉल यांनी लक्ष वेधले.

भारतात १८ वर्षांवरील नागरिकांची लोकसंख्या सुमारे ९५ कोटीहून अधिक आहे. इतक्या जणांचे लसीकरण करण्यासाठी २०० कोटी लसींचे डोस लागतील. देशात लसींची उपलब्धता वाढावी यासाठी विविध विभाग, परराष्ट्र मंत्रालय फायजर, मॉडर्ना, जॉन्सन ऍण्ड जॉन्सनसारख्या कंपन्यांबरोबर सतत संपर्कात आहे. या कंपन्या जुलैनंतर भारतात लस उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे, असे डॉ. पॉल यांनी सांगितले. ‘स्पुटनिक व्ही’ या रशियन लसींची निर्मितीही जुलैपासून भारतात सुरू होईल. सध्या या लसींची आयात होत असून पुढील आठवड्यांपासून या लसी लसीकरणासाठी उपलब्ध होतील, अशी माहिती डॉ. पॉल यांनी दिली.

लसींचे, उपलब्ध, डॉ. व्ही. के. पॉल, नीति आयोग, लस निर्मिती, भारत, एनटीएजीआययाशिवाय भारतात सध्या लस निर्मिती करीत असलेल्या सीरम आणि भारत बायोटेक या कंपन्या आपल्या प्रकल्पांची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढवत आहेत. त्यामुळे कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींची उपलब्धता वाढेल, असे डॉ. पॉल म्हणाले. ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान निरनिराळ्या लसींचे २१६ कोटी डोस भारतात उपलब्ध होतील. ‘कोविशिल्ड’चे सुमारे ७५ कोटी डोस, ‘कोव्हॅक्सिन’चे सुमारे ५५ कोटी डोस, ‘बायो ई’ लसीचे ३० कोटी डोस, भारत बायोटेकने विकसित केलेल्या नोजल लसीचे १० कोटी डोस, ‘नोवाव्हॅक्स’चे २० कोटी, ‘स्पुटनिक व्ही’चे १५ कोटी, ‘झायडस कॅडिला’चे ५ कोटी उपलब्ध होतील. याशिवाय इतर लसीही भारतीय बाजारात उपलब्ध असतील, असा दावा डॉ. पॉल यांनी केला.

दरम्यान, देशात कोरोनाची दुसरी लाट येईल हे माहित होते व यासाठी घबराट पसरणार नाही अशारितीने राज्य सरकारे आणि नागरीकांना सतत सावध करण्यात येत होते. पंतप्रधानांनीही मार्च महिन्यात राज्यांना याबाबत सांगितले होते. मात्र लाट किती मोठी असेल याचा अंदाज आधीच बांधला जाऊ शकत नाही, असे डॉ. पॉल यांनी स्पष्ट केले.

भारत बायोटेक ‘कोव्हॅक्सिन’चा फॉर्म्युला इतर कंपन्यांना देण्यास तयार 

भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ची लस इतर कंपन्यांनाही उत्पादनासाठी खुली करावी, अशी मागणी करण्यात येत होती. भारत बायोटेकनेही या मागणीचे स्वागत केले आहे. यासाठी कंपनी आपला फार्म्युला इतर कंपनीना देण्यास तयार आहे. मात्र ही लस बनविण्यासाठी जे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे, त्यामध्ये जिवंत विषाणूचा वापर होतो. या प्रक्रियेला केवळ बीएसएल-३ दर्जाच्या प्रयोगशाळांची आवश्यकता असते. मात्र अशापद्धतीची प्रयोगशाळा लस बनविणार्‍या इतर कोणत्याही कंपनीजवळ नाही. पण जर कंपन्या अशी प्रयोगशाळा बनवून लस निर्मितीसाठी तयार असतील, तर त्यांचे स्वागत असेल, असे डॉ. पॉल यांनी स्पष्ट केले.

 

‘कोविशिल्ड’च्या दोन लसींमधील अंतर आणखी वाढले 

ऑक्सफर्ड-एस्ट्रॉजेनिकाने विकसित केलेल्या ‘कोविशिल्ड’ लसींच्या दोन डोसमधील अंतर आणखी वाढविण्यात आले आहे. भारतात ‘कोविशिल्ड’ची लसींचा दुसरा डोस सुरुवातीच्या काळात ४ ते ६ आठवड्याच्या अंतराने दिला जात होता. मात्र दोन महिन्यांपूर्वी या लसींच्या दोन डोसमधील अंतर वाढवून ६ ते ८ आठवडे करण्यात आले. लसींमधील अंतर वाढविल्याने लस आणखी प्रभावी ठरत असल्याचे संशोधनात लक्षात आले होते. यानंतर ब्रिटनसारख्या देशांनी ‘कोविशिल्ड’च्या दोन डोसमधील अंतर १२ आठवड्यांपर्यंत वाढविले होते. भारतानेही ‘कोविशिल्ड’च्या दोन डोसमधील अंतर आधीच्या ६ ते ८ आठवड्यावरुन १२ आठवडे करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. ‘नॅशनल टेक्नॉलॉजिकल ऍडव्हायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन’ (एनटीएजीआय) या तज्ज्ञ समितीने तशी शिफारस सरकारकडे केली होती.

leave a reply