२०२१ सालात भारताचा विकासदर ११.५ वर जाईल

- आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा निष्कर्ष

विकासदरनवी दिल्ली – २०२१ सालात भारतीय अर्थव्यवस्था तब्बल ११.५ टक्के इतक्या विकासदराने प्रगती करील, असा निष्कर्ष आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने नोंदविला आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सचे ध्येय गाठण्यासाठी वेगाने आगेकूच करील, असा विश्‍वास अर्थतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. तर केंद्रीय व्यापार व उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी यावर समाधान व्यक्त केले असून जागतिक अर्थव्यवस्थेत भारत चमकता तारा बनल्याचे म्हटले आहे.

कोरोनाच्या संकटात जगभरातील इतर देशांसह भारतीय अर्थव्यवस्थेसमोरही गंभीर संकट खडे ठाकले होते. या काळात अर्थव्यवहार ठप्प पडल्याने फार मोठी समस्या निर्माण झाली होती. मात्र या काळात भारताने लॉकडाऊन कायम ठेवून ही साथ थोपविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पुढच्या काळात भारताने हळुहळू अर्थकारणाला गती देण्याचा निर्णय घेतला. याचे परिणाम आता दिसू लागले असून भारतीय अर्थव्यवस्था वेग पकडू लागली आहे. जीएसटीमध्ये नोंदविण्यात आलेली विक्रमी वाढ याची साक्ष देत असल्याचे अर्थतज्ज्ञ तसेच उद्योगक्षेत्रातील मान्यवरांचे म्हणणे आहे.

डिसेंबर महिन्यात देशातील जीएसटी महसूल १.१५ लाख कोटी रुपयांच्याही पुढे गेला होता. जीएसटी लागू झाल्यानंतरच्या काळातला आजवरचा विक्रम मानला जातो. यामुळे भारतीय अर्थव्यवस्था मंदीचा काळ मागे टाकून पुढे चालल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतरच्या काळात देशभरातील मागणी वाढली व उत्पादनातही वाढ झाल्याचे स्पष्ट झाले होते. या पार्श्‍वभूमीवर, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आपल्या अहवालात बदल करून भारतीय अर्थव्यवस्था २०२१ सालात ११.५ टक्के इतक्या वेगाने प्रगती करील, असा निष्कर्ष नोंदविला आहे. २०२२ सालात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर ६.८ टक्के इतका असेल, असे नाणेनिधीने म्हटले आहे. याचा फार मोठा लाभ भारतीय अर्थव्यवस्थेला मिळेल. भारतीय अर्थव्यस्था पाच ट्रिलियन डॉलर्सचे ध्येय यामुळे सहजपणे गाठू शकते, असा विश्‍वास उद्योगक्षेत्राकडून व्यक्त केला जातो. कोरोनाच्या संकटामुळे इतर देशांच्या अर्थव्यवस्थांना हादरे बसलेले असताना, यातून बाहेर पडून भारतीय अर्थव्यवस्था दाखवित असलेला हा अत्यंत सकारात्मक कल ही खूप मोठ्या समाधानाची बाब ठरते, असे उद्योगक्षेत्रातील मान्यवरांचे म्हणणे आहे.

भारतात विकसित झालेल्या कोरोना प्रतिबंधक लसींचा देशाच्या बाजारपेठेवर खूप मोठा सकारात्मक परिणाम झाला, याकडेही अर्थविश्‍लेषक लक्ष वेधत आहेत. दरम्यान, भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असून त्याचा आर्थिक कामगिरीवर फार मोठा प्रभाव पडत असल्याचेही तज्ज्ञ सांगत आहेत. याच कारणामुळे भारतात येणारी थेट परकीय गुंतवणूक वाढत असल्याचे बोलले जाते. कोरोनाचे संकट असताना देखील भारतात होणार्‍या थेट परकीय गुंतवणुकीत फार मोठी वाढ झाली होती. त्याचवेळी आपली आयात कमी करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाचाही मोठा प्रभाव पुढच्या काळात पहायला मिळेल, असे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

leave a reply