अफगाणिस्तानच्या लष्कराने 24 तासात 210 तालिबानी दहशतवाद्यांना संपविले

काबुल – गेल्या 24 तासात 210 तालिबानी दहशतवाद्यांना ठार करून अफगाणिस्तानच्या लष्कराने या संघर्षात आपली सरशी होत असल्याचे संकेत दिले. असे असले तरी काही ठिकणी तालिबानच्या हल्ल्यानंतर अफगाणी लष्कराचे जवान आपल्या चौक्या सोडून पळ काढत असल्याच्या बातम्या येत आहेत. तालिबानचा धोका वाढल्याने ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील आपल्या दूतावास बंद केला. तर अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड यांनी मुदतीच्या आधीच अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानातून माघार घेईल, अशी घोषणा केली आहे.

अफगाणिस्तानच्या लष्कराने 24 तासात 210 तालिबानी दहशतवाद्यांना संपविलेअफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासात 16 प्रांतांमध्ये केलेल्य कारवाईत 210 तालिबानी दहशतवादी ठार तर 95 जखमी झाले. यापैकी कुंदूझमध्ये 35 तर बल्खमध्ये 23 दहशतवादी मारले गेले. तालिबानच्या विरोधातील कारवाईत अफगाणी लष्कराची सरशी होत असल्याचे नाटोचे प्रमुख जेन स्टोल्टनबर्ग यांनी म्हटले आहे. त्याचवेळी गेल्या महिन्याभरात तालिबानी दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमुळे अफगाणी जवानांनी चार प्रांतातील 26 चौक्या सोडून पळ काढल्याची माहितीही समोर येत आहे. यामध्ये लघमान प्रांतातील सात चौक्यांचा समावेश आहे. इथली शस्त्रास्त्रे व अन्नधान्याचा मोठा साठा तालिबानच्या हाती पडला आहे.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी 11 सप्टेंबरपर्यंत अफगाणिस्तानातील सैन्यमाघार पूर्ण होईल, असे जाहीर केले होते. पण त्याआधीच अमेरिकेचे जवान अफगाणिस्तानातून माघार घेतील, असे अमेरिकेचे संरक्षणमंत्री ऑस्टिन यांनी अमेरिकन काँग्रेससमोर स्पष्ट केले. याआधी ऑस्टिन यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याचे वृत्त आहे.

leave a reply