महाराष्ट्रात एका दिवसात कोरोनाने २२७ जण दगावले

- नव्या रुग्णांची संख्या पुन्हा ४० हजारांवर | जनतेने कडक निर्बंधांसाठी तयार राहण्याचा आरोग्यमंत्र्यांचा इशारा

मुंबई – रविवारी महाराष्ट्रात कोरोनाचे ४० हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळले होते. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली होती. मात्र बुधवारी पुन्हा एकदा कोरोनाचे सुमारे ४० हजार नवे रुग्ण आढळले असून २२७ जणांचा बळी गेला आहे. राज्यातील कोरोनाच्या साथीची परिस्थिती नियंत्रणात येत नसून येत्या काही दिवसात आणखी उद्रेक दिसून येईल, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनचा निर्णय अद्याप झालेला नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. तसेच कोरोनाचे संक्रमण थोपविण्यासाठी राज्य सरकार अधिक कडक निर्बंध लादण्याचा निर्णय घेऊ शकते. नागरिकांनी यासाठी आपली मानसिक तयारी करावी, असा इशारा आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे. तसेच लॉकडाऊन टाळायचा असेल, तर नियम पाळणे एकमेव उपाय आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी बजावले आहे.

राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. बुधवारी त्यामध्ये ३९ हजार ५४४ नव्या रुग्णांची भर पडली. तसेच २२७ जणांचा बळी गेला. गेल्या चार महिन्यातील एका दिवसात राज्यात गेलेल्या बळींची ही सर्वाधिक संख्या आहे. यामुळे चिंता अधिकच वाढल्या आहेत. सध्या राज्यात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ३ लाख ५६ हजार २४३ वर पोहोचली आहे. तसेच एकूण १७ लाख २९ हजार ८१६ जण होम क्वॉरंटाईन आहेत, तर १७ हजार ८६३ जण हे संस्थात्मक क्वॉरंटाईन असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे.

बुधवारी मुंबईत कोरोनाच्या ५३९९ नव्या रुग्णांची नोंद झाली. तसेच १५ जणांचा बळी गेला. तर मुंबई महापालिकाक्षेत्रासह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भाईंदर, वसई-विरार, पालघर, रायगड आणि पनवेल मिळून होणार्‍या ठाणे मंडळात एकूण ९९४१ नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच एकूण ३३ जण या साथीने दगावले आहेत.

पुणे मंडळातही ९५७१ नवे रुग्ण आढळले असून ३७ जणांचा बळी गेला आहे. यामध्ये पुणे महापालिका क्षेत्रात ४५०२ आणि पिंपरी-चिंचवडमध्ये २२९४ नवे रुग्ण आढळले आहेत. यापाठोपाठ नाशिक मंडळात ८४०४ नवे रुग्ण सापडले असून ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. नागपूर मंडळात ४५६१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर ५४ जणांचा बळी गेला आहे. राज्यात कोरोनाने होणारे सर्वाधिक मृत्यु हे गेल्या काही दिवसांपासून नागपूरमध्ये नांेंदविले जात आहेत.

दरम्यान, लातूर मंडळात २५६३, अकोला मंडळात १६६०, औरंगाबाद मंडळात २२८७ नवे रुग्ण आढळले, तर अनुक्रमे २९, १७ आणि १५ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर लसीकरणाचा वेग वाढविण्यात आला आहे.

leave a reply