अफगाणिस्तानातील गुरुद्वारावरील भ्याड दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा बळी  

अफगाणिस्तानची राजधानी काबुल येथील शिखधर्मियांच्या गुरुद्वारावर दहशतवाद्यांनी चढविलेल्या भ्याड  हल्ल्यात २७ जणांचा बळी गेला. या हल्ल्याची जबाबदारी ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. असे असले तरी, तालिबानच्या हक्कानी नेटवर्क गटाने हा हल्ला घडविला असावा, असा संशय अफगाणी गुप्तचर यंत्रणा व्यक्त करीत आहेत. हक्कानी नेटवर्कला पकिस्तानकडून संपूर्ण सहाय्य व संरक्षण मिळत आले आहे.

बुधवारी सकाळी ७.४५ वाजता काबुलमधील गुरुद्वाराच्या आवारात घुसखोरी करुन दहशतवाद्यांनी हल्ले चढविले. यावेळी गुरुद्वारामध्ये दीडशे भाविक उपस्थित होते, अशी माहिती अफगाणी संसदेतील शिखधर्मिय संसद सदस्या अनारकली कौर यांनी दिली. काही दहशतवाद्यांनी गोळीबारानंतर आत्मघाती स्फोट घडवून आणला. या हल्ल्यात २७ जणांचा बळी गेला असून यामध्ये एका बाळाचाही समावेश आहे. भारताने या भ्याड हल्ल्याची कडक शब्दात निर्भत्सना केली.

प्रार्थनास्थळांवर झालेला हा भ्याड हल्ला दहशतवाद्यांची अघोरी मानसिकता दाखवून देणारा असल्याची टीका भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली. या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानच्या सरकारने याचे कटकारस्थान आखणार्यांचा शोध सुरू केला आहे. अफगाणिस्तानातील ‘आयएस’ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. मात्र अफगाणी गुप्तचर यंत्रणा आयएसच्या या दाव्यावर विश्वास ठेवायला तयार नाही.

याआधीही आयएसने आपण न केलेल्या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारल्याची काही उदाहरणे आहेत. बुधवारचा हा हल्ला तालिबानच्या हक्कानी नेटवर्कनेच घडवून आणला असावा, अशी दाट शक्यता अफगाणी गुप्तचर यंत्रणा वर्तवित आहेत. हक्कानी नेटवर्कने याआधी अफगाणिस्तानातील भारतीय दूतावास आणि भारतीय कर्मचाऱ्यांवार हल्ले चढविले होते. पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’च्या आदेशांवर हक्कानी नेटवर्कने हे हल्ले चढविल्याचा आरोप भारताने केला होता.

दरम्यान, अमेरिका आणि तालिबानमध्ये अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शांतीकरार झाला आहे. यानुसार अमेरिका अफगाणिस्तानातील आपले सैन्य लवकरच माघारी घेईल. हा तालिबानचा विजय ठरतो, असे दावे करुन पाकिस्तानमधील तालिबानसमर्थक विश्लेषक आता अफगाणिस्तानचा वापर भारताच्या विरोधात करण्याची स्वप्ने पाहू लागले आहेत. बुधवारचा हल्ला याला दुजोरा देणारा असल्याचे संकेत मिळत आहेत.

leave a reply