देशात चोवीस तासात कोरोनाचे साडेतीन लाख रुग्ण बरे झाले

नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी घट दिसून आली आहे. तसेच या साथीच्या बरे होणार्‍या रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. सोमवारच्या सकाळपर्यंतच्या चोवीस तासा देशात तीन लाख ६६ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली, तर सुमारे तीन लाख ५४ हजार कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले. सोमवारी सायंकाळपर्यंत विविध राज्यांनी जाहीर केलेली माहिती पाहता रुग्ण संख्येत आणखी घट दिसून येईल, असे स्पष्ट दिसत आहे. सोमवारी महाराष्ट्रात ४० हजारांपेक्षाही कमी रुग्णांची नोंद झाली आहे. ३० मार्चनंतर महाराष्ट्रात एका दिवसात नोंद झालेले कोरोनाचे सर्वात कमी रुग्ण आहेत. त्याचवेळी राज्यात एकाच दिवसात ६१ हजार ६०७ रुग्ण बरे झाले आहेत.

रुग्ण बरेमहाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्येत गेल्या दोन दिवसात घट दिसून आली आहे. मात्र रविवारच्या दिवसात चाचण्या कमी झाल्याने सुद्धा नव्या रुग्णांची संख्या घट दिसून येत असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. तरीही गेल्या दोन दिवसातील चित्र अशादायी आहे. याआधी विविध अहवालात १३ मे १५ मे पर्यंत देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे शिखर गाठले जाईल, त्यानंतर हळूहळू रुग्णसंख्या कमी होत जाईल, असे तज्ज्ञांनी दावा केला होता. महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये मेच्या दुसर्‍या आठवड्यापासून रुग्णसंख्येत घट दिसू लागेल, असे निष्कर्ष काढण्यात आले होते.

या पार्श्‍वभूमीवर रविवारी महाराष्ट्रात कोरोनाचे ४८ हजार ४०१ इतके कोरोनाचे नवे रुग्ण आढळले होते. ५७२ जणांचा बळी गेला होता. मुंबईसारख्या प्रचंड लोकसंख्येच्या शहरात केवळ २ हजार ३९५ नवे रुग्ण आढळले होते. तेच सोमवारी ५४९ जण कोरोनाने दगावले, तर ३७ हजार २३६ नव्या रुग्णांची नोंद झाली. रविवारच्या तुलनेत महाराष्ट्रात एका दिवसात आढळलेल्या कोरोना रुग्णांची संख्या सुमारे ११ हजाराने कमी झाली आहे. मुंबईतही दोन हजारांपेक्षा कमी रुग्ण चोवीस तासात आढळले आहेत. मुंबईत १७८२ नवे रुग्ण आढळले, तर ७४ जणांचा बळी गेला.

सोलापूर, सातारा व पुणे जिल्ह्याचा समावेश असलेल्या पुणे विभागात कोरोनाचे ८१२० नवे रुग्ण आढळले, नाशिक विभागात ७१५१, नागपूर विभागात ५५१२ नव्या रुग्णांची नोंद झाली. सोमवारी १ लाख ९२ हजार चाचण्या राज्यभरात पार पडल्या. याआधीच्या गेल्या आठवड्यात दिवसला २ लाख ६० हजार चाचण्या झाल्या होत्या.

दरम्यान, इतर राज्यातही कर्नाटक वगळता कोरोनाचे रुग्णांची संख्या कमी झाल्याचे सोमवारी या राज्यांनी जाहीर केलेल्या माहितीवरून स्पष्ट होते. सोमवारी कर्नाटकात देशात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळत होते. कर्नाटकात कर्नाटकात सुमारे ४० हजार नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ५९६ रुग्णांचा बळी गेला. केरळात २७ हजार ४८८ नवे रुग्ण सापडले असून ६५ जण दगावले आहेत. उत्तर प्रदेशात सोमवारी चोवीस तासात २७८ जणांचा बळी गेला, तसेच २१ हजार ३३१ नवे रुग्ण आढळले. दिल्लीत १२ हजार ६०० नव्या रुग्णांची नोंद झाली व ३१९ जणांचा मृत्यु झाला.

leave a reply