अफगाणी सुरक्षादल आणि नाटोच्या कारवाईत ३४ तालिबानी ठार

काबूल – मंगळवारी अफगाणिस्तानच्या कंदहार प्रांतातल्या तालिबानने केलेल्या हल्ल्यात सात अफगाणी सुरक्षादलाच्या जवानांचा बळी गेला. तर त्याला काही तास उलटत नाही तोच तालिबानने गझनीमधल्या अफगाणी सुरक्षा चौकीला लक्ष्य केले. या हल्ल्यात सुरक्षादलाला नऊ तालिबानींना ठार करण्यात यश आले. तसेच सोमवारी रात्री नाटोने अफगाणिस्तानमध्ये चढविलेल्या हल्ल्यात २५ तालिबानी ठार झाल्याचे वृत्त आहे. यात बारा पाकिस्तानी नागरिक असल्याचे समोर आले आहे.

Afghan-NATO-Talibanमंगळवारी अफगाणिस्तानच्या कंदहार प्रांतातल्या तख्ता पुला जिल्ह्यात तालिबानने अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलाच्या चौकीवर हल्ला चढविला. या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना सुरक्षा दलाच्या सात जवानांचा बळी गेला. तर त्याच रात्री तालिबानने गझनीमधल्या एका गावातील अफगाणी सुरक्षा दलाच्या चौकीवर हल्ला चढविला. यावेळी अफगाणी स्पेशल फोर्स कमांडने नऊ तालिबानींना ठार केले. यात ‘अबु जंदाल’ नावाचा तालिबानच्या नेत्याचा समावेश होता. सोमवारी रात्री अफगाणिस्तानच्या कंदहारमधल्या ‘तख्त ई पोल’टाऊनमध्ये नाटोने चढविलेल्या हवाई हल्ल्यात २५ तालिबानी ठार झाले. यात १२ पाकिस्तानी नागरिकांचा समावेश होता. कंदहारच्या पोलिसांनी या पाकिस्तानी नागरिकांचे ओळखपत्र सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानच्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचा हात असल्याचे नव्याने समोर आले आहे.

दरम्यान, गेल्या दोन आठवड्यात तालिबानने अफगाणिस्तानच्या १३ प्रांतात जोरदार हल्ले चढविले आहेत. तालिबान मोठ्या प्रमाणावर अफगाणिस्तानची सुरक्षादले आणि सरकारी कार्यालयांना लक्ष्य करीत आहे. त्यामुळे अफगाणिस्तान आणि तालिबानमधील शांतीचर्चा धोक्यात आली आहे. तसेच अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्यमाघार घ्यायला सुरुवात केल्यावर अफगाणिस्तानातील तालिबानचे हल्ले वाढले आहेत. त्यामुळे अफगाणी सुरक्षा दलांसमोर फार मोठे आव्हान आहे.

leave a reply