३५० अफगाणी जवानांची तालिबानसमोर शरणागती

  • तालिबानने अफगाणी लष्कराचे रणगाडे पाकिस्तानला पुरविले
  • अफगाणिस्तानच्या सरकारचा तालिबानसह पाकिस्तानला इशारा

काबुल – अफगाणिस्तानच्या दक्षिणेकडील झाबुल प्रांतात झालेल्या संघर्षात सुमारे ३५० जवानांनी तालिबानसमोर शरणागती पत्करली. यामुळे तालिबानची ताकद अधिकच वाढली आहे. तालिबानने अफगाणी जवानांकडून जप्त केलेले रणगाडे, लष्करी वाहने व इतर शस्त्रसाठा सीमेपलिकडील पाकिस्तानी लष्कराकडे सोपविल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र पाकिस्तानबरोबरच्या ड्युरंड लाईनजवळ अफगाणी लष्कराच्या शस्त्रास्त्रांची तस्करी केलेली दिसली तर, त्यावर हवाई हल्ले चढवू, असा इशारा अफगाणिस्तानच्या हंगामी अंतर्गत सुरक्षामंत्र्यांनी दिला. पाकिस्तान गेली दोन दशके तालिबानला सुरक्षित आश्रय देत असल्याचा आरोप अमेरिकेच्या माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी दोन दिवसांपूर्वीच केला होता.

तालिबानसमोर शरणागतीअफगाणिस्तानातील पाकिस्तान सीमेजवळच्या प्रांतांमध्ये मोठा संघर्ष भडकला आहे. पाकतिया, पाकतिका, झाबुल प्रांताचा ताबा घेण्यासाठी तालिबानने हल्ले वाढविल्याच्या बातम्या येत आहेत. यापैकी पाकतिया प्रांतात तीन दिवस संघर्ष सुरू होता. गेल्या आठवड्यात अफगाणी लष्कराने तालिबानच्या ठिकाणांवर हल्ले चढवून काही दहशतवाद्यांना ताब्यात घेतले होते. यामध्ये पाकिस्तानी लष्कराच्या जवानाचा समावेश असल्याचे समोर आले होते. त्यानंतर तालिबानने पाकतिया प्रांतातील हल्ले वाढविल्याचे अफगाणी वृत्तसंस्थांचे म्हणणे आहे.

तर पाकिस्तानच्या सीमेजवळील झाबुल प्रांतातही तालिबानने अफगाणी लष्करावर जोरदार हल्ले चढविले. या हल्ल्यात ३५० जवानांनी तालिबानसमोर शरणागती पत्करल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत. यासंबंधीचे काही व्हिडिओ समोर आले असून एका व्हिडिओमध्ये तालिबानने अफगाणी जवानांकडील रणगाडे, लष्करी वाहने व इतर शस्त्रसाठ्यांचा ताबा घेतल्याचे दाखविले आहे. झाबुल प्रांताबरोबर गझनी, फरयाब प्रांतातही तालिबानचे दहशतवादी अफगाणी लष्कराच्या वाहनांचा ताबा घेतानाच्या बातम्या व फोटोग्राफ्स समोर येत आहेत.

तालिबानसमोर शरणागतीयापैकी काही रणगाडे, लष्करी वाहने व शस्त्रसाठा अफगाण-पाकिस्तानमधील वादग्रस्त ड्युरंड लाईनजवळ पाकिस्तानी जवानांच्या ताब्यात दिले जात असल्याचे व्हिडिओही प्रसिद्ध झाले. अफगाणिस्तानच्या सरकारने याची गंभीर दखल घेतली. तसेच अफगाणी तसेच अमेरिका आणि नाटोची लष्करी वाहने, रणगाडे किंवा इतर शस्त्रसाठा सीमेपलिकडे पाकिस्तानात पाठविला जात असल्याचे दिसल्यास, त्यावर थेट हवाई हल्ले चढविले जातील, असा इशारा अफगाणिस्तानचे हंगामी अंतर्गत सुरक्षामंत्री जनरल अब्दुल सत्तार मिर्झाक्वल यांनी दिला.

असाच आरोप अफगाणिस्तानच्या ‘इंडिपेडन्ट डायरेक्टोरेट ऑफ लोकल गव्हर्नन्स’चे प्रमुख शमिम खान कटावाझाई यांनी केला. पाकिस्तानी लष्कराने तालिबानकडून अफगाणी लष्कराचे रणगाडे मिळविल्याचे कटावाझाई यांनी म्हटले आहे. पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी तालिबानकडून मिळविलेल्या लष्करी वाहनांसोबत फोटोग्राफ्स काढले तसेच यासंबंधीचा व्हिडिओ पुरावा असल्याचा दावा कटावाझाई यांनी केला. पण तालिबानचा प्रवक्ता झबिहुल्लाह मुजाहिद याने हा दावा फेटाळला.

पाकिस्तानने कितीही नाकारले तरी गेली दोन दशके तालिबान, अल कायदा आणि इतर दहशतवादी संघटनांना पाकिस्तानने आश्रय दिल्याचा आरोप अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी केला होता. पाकिस्तानच्याच पाठबळावर तालिबान अफगाणिस्तानात आपली राजवट आणण्याच्या तयारीत असल्याचे बोल्टन दोन दिवसांपूर्वीच म्हणाले होते.

पाकिस्तानातील माध्यमांनी हे आरोप फेटाळून आपल्या देशाने अमेरिकेच्या दहशतवादविरोधी युद्धासाठी आपल्या देशाने फार मोठा त्याग केल्याचा दावा केला. पण तालिबान आणि पाकिस्तानी लष्करामधील साटेलोट्याचे पुरावे व्हिडिओ व फोटोग्राफ्समध्ये असल्याचे सांगून अफगाणिस्तानने पाकिस्तानचा आणखी एकदा पर्दाफाश केला आहे.

leave a reply