महिनाभरात नायजेरियात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ३८४ जणांचा बळी

- आंतरराष्ट्रीय संघटनेचा दावा

अबूजा – एप्रिल महिन्यात नायजेरियामध्ये दहशतवादी तसेच कट्टरपंथी टोळ्यांनी चढविलेल्या हल्ल्यांमध्ये ३८४ नागरिकांचा बळी गेला आहे. यामध्ये बोको हराम या दहशतवादी संघटनेच्या हल्ल्यात ठार झालेल्यांची संख्या मोटी असल्याचे आंतरराष्ट्रीय संघटनेने म्हटले आहे. दरम्यान, रविवारी दहशतवाद्यांनी नायजेरियाच्या बोर्नो प्रांतातील लष्कराच्या तळांवर चढविलेल्या हल्ल्यात आठ जणांचा बळी गेला.

नायजेरियाच्या लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी बोर्नो प्रांताची राजधानी मैदूगुरीजवळच्या अजिरी भागात बोको हरामच्या दहशतवाद्यांनी हल्ला चढविला. येथील लष्करी तळावर ताबा मिळविण्यासाठी सुमारे दोन तास संघर्ष सुरू होता. या संघर्षात दहशतवाद्यांनी तळाचा ताबा घेतल्यानंतर नायजेरियन लष्कराला पळ काढावा लागला. तर काही तास आधी दहशतवाद्यांनी मैदूगुरीपासून १७२ किलोमीटर अंतरावर असलेल्या रण येथील लष्करी तळावरही हल्ला चढविला होता. पण लष्कराच्या कारवाईनंतर दहशतवाद्यांनी पळ काढल्याचे नायजेरियाच्या लष्कराने स्पष्ट केले.

गेल्या काही आठवड्यांपासून बोको हराम या दहशतवादी संघटनेप्रमाणे फुलानी हा कट्टरपंथी लूटारू टोळीचे नायजेरियातील हल्ले वाढले आहेत. फुलानी टोळीने एप्रिल महिन्यात चढविलेल्या हल्ल्यांमध्ये १७३ जणांचा बळी गेल्याची माहिती नायजेरियातील घडामोडींवर लक्ष ठेवणार्‍या आंतरराष्ट्रीय संघटनेने प्रसिद्ध केली आहे. तर सुमारे दोनशे नागरिक बोको हरामच्या हल्ल्यांमध्ये दगावले. याशिवाय ‘इंडिजिनीअस पिपल ऑफ बियाफ्रा’ या टोळीच्या हल्ल्यांमध्ये आठ जणांचा बळी गेला.

नायजेरियातील बोर्नो, इबोनी या प्रांतात सर्वाधिक जीवितहानी झाली आहे. तर नायजेरियाच्या आग्नेय आणि दक्षिणेकडील भागातही तुरळक हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांबरोबर नायजेरियामधील दहशतवादी आणि कट्टरपंथी टोळ्यांकडून विद्यार्थ्यांच्या अपहरणाचे प्रकारही वाढले आहेत. एप्रिल महिन्यातच फुलानी टोळीने १२५ जणांचे अपहरण केले होते. या घटनेने नायजेरिया हादरून गेले होते. पुढच्या काही दिवसांमध्ये या सव्वाशे जणांची यशस्वीरित्या सुटका करण्यात आली होती.

इंधन आणि खनिजसंपत्तीने समृद्ध असलेल्या नायजेरिया या आफ्रिकी देशामध्ये गेले दशकभर बोको हराम या ‘आयएस’ संलग्न दहशतवादी संघटनेने उच्छाद मांडला आहे. गेल्या दशकभराच्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये ३६ हजारांहून अधिक नायजेरियन नागरिकांचा बळी गेला आहे. तर ३० लाखाहून अधिक जण विस्थापित झाले आहेत. बोको हरामच्या या हल्ल्यांमुळे विस्थापित झालेल्या लाखो जणांनी नायजेर, छाड या देशांच्या सीमाभागात आश्रय घेतल्याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार संघटना देत आहेत.

leave a reply