छत्तीसगडच्या सुकमामध्ये सुरक्षादलांच्या कारवाईत चार माओवादी ठार

सुकमा – छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षादल आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार माओवाद्यांना ठार करण्यात आले. ठार झालेल्या माओवाद्यांकडून शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ही चकमक सुकमा जिल्ह्यातील जागरगुंडाच्या जंगलात घडली.

Chattisgadh-maoistsसुकमा जिल्ह्यातील फुलमपर गावच्या जंगलात माओवादी लपल्याची खबर सुरक्षा दलाला मिळाली. त्यानंतर डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड (डीआरजी), सेंट्रल रिझर्व्ह फोर्स (सीआरपीएफ) आणि कंमाडो बटालियन फॉर रिझोल्युट ॲक्शन (कोब्रा) यांचे संयुक्त पथक माओवाद्यांना पकडण्यासाठी रवाना झाले. पण माओवाद्यांनाही हे पथक आल्याची खबर मिळाली आणि त्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरु केला.

सुरक्षादलांनीही माओवाद्यांच्या या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले. ही चकमक बराच वेळ सुरू होती. सुरक्षादलांच्या जवानांना चकमकीच्या ठिकाणाहून चार माओवाद्यांचे मृतदेह सापडले. येथून चार ३०३ रायफल व स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले आहे. या माओवाद्यांचे साथीदार जंगलात पळून जाण्यास यशस्वी ठरले. त्यांना पकडण्याची मोहिम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

leave a reply