येमेनमधील संघर्षात हौथींचे 40 बंडखोर ठार

40 बंडखोर ठारअलेक्झांड्रीया – येमेनचे लष्कर आणि हौथी बंडखोर यांच्यात मारिब प्रांतात पेटलेल्या संघर्षात किमान 40 बंडखोर ठार झाल्याचे वृत्त आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरुन केले जाणारे संघर्षबंदीचे आवाहन धुडकावणार्‍या हौथी बंडखोरांवर येमेनच्या लष्कराने हवाई हल्ले चढविल्याचा दावा केला जातो. दरम्यान, इराणसंलग्न हौथी बंडखोर संघर्षासाठी ‘चाईल्ड सोल्जर’ना प्रशिक्षण देत असून याचे भयंकर परिणाम समोर येतील, असा इशारा येमेनच्या सरकारने दिला.

गेल्या चोवीस तासात येमेनच्या लष्कराने इंधनसंपन्न मारिबसह लहज, जौफ आणि अल-बेदा या प्रांतातील हौथी बंडखोरांच्या ठिकाणांवर कारवाई केली. यापैकी मारिब प्रांताच्या रहाबाह जिल्ह्यात लष्कराच्या कारवाईत किमान 40 बंडखोर ठार झाले. या डोंगराळ भागातील कारवाईसाठी आखाती देशांच्या हवाईदलाने येमेनच्या लष्कराला सहाय्य केले.

हौथी बंडखोरांनी येमेनच्या अधिकृत सरकारबरोबर संघर्षबंदी करावी आणि देशात शांती प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन आंतरराष्ट्रीय समुदायाने केले होते. पण संघर्षबंदीसाठी तयार नसलेल्या हौथी बंडखोरांनी मारिबवर ताबा मिळविण्यासाठी हल्ले सुरू ठेवल्यामुळे ही कारवाई करावी लागल्याचे येमेनच्या लष्कराने म्हटले आहे.

येमेनच्या सरकारमधील वरिष्ठ मंत्री मुअम्मर अल-इरयानी यांनी हौथी बंडखोरांवर गंभीर आरोप केला. ‘इराणचे हित जपण्यासाठी हौथी बंडखोर त्यांच्या ताब्यात असलेल्या भागातील मुलांना शिक्षण, खेळ आणि सामान्य जीवनापासून वंचित ठेवत आहेत. अशा मुलांना हौथी लष्करी प्रशिक्षण देऊन त्यांचा संघर्षात वापर करीत आहेत’, असा ठपका इरयानी यांनी ठेवला. येमेनमधील सौदी अरेबिया समर्थक सरकारविरोधात संघर्ष करण्यासाठी इराण हौथी बंडखोरांना सहाय्य करीत असल्याचा आरोप केला जातो.

leave a reply