देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४० हजारावर

नवी दिल्ली – सोमवारपासून देशातील लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरु होत आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील जनतेला या लॉकडाऊनमध्ये अधिक सूट मिळणार आहे. मात्र त्याआधी देशात कोरोनाव्हायरसच्या संक्रमणाबाबत चिंता वाढविणारी बातमी समोर आली आहे. शनिवारच्या चोवीस तासात कोरोनामुळे ९९ जणांचा बळी गेला, तर २,५६४ नवे रुग्ण आढळले. एका दिवसात बळी आणि रुग्णांच्या संख्येबाबत हा देशातील नवा उच्चांक ठरतो. यामुळे देशात या साथीच्या बळींची संख्या १३०१ वर गेली असून या साथीच्या एकूण रुग्णांची संख्या ४० हजारावर पोहोचली आहे.

दुसऱ्या टप्पातील लॉकडाउनच्या संपत असताना देशातील कोरोनाव्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. शुक्रवारी दिवसभरात ७१ जणांचा बळी गेला होता, तर २३३३ नवे रुग्ण सापडले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी नवे रुग्ण आढळण्याच्या बाबतीत नवा उच्चांक झाला आहे. सर्वात वाईट स्थिती महाराष्ट्रात असून राज्यात आतापर्यंत ५२१ जण या साथीत दगावले आहेत, तर एकूण रुग्णांची संख्या १२,२९६ झाली आहे. शनिवारी राज्यात एकाच दिवसात ३६ जणांचा बळी गेला, तर ७९० नवे रुग्ण आढळले. यामध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद मुंबईत झाली आहे. मुंबईत चोवीस तासात २७ जणांचा बळी गेला असून ५४७ नवे रुग्ण आढळले. यामुळे मुंबईत या साथीने आतापर्यंत ३२२ जणांचा मृत्यू झाला आहे आणि एकूण रुग्णांची संख्या ८,१७२ वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रानंतर गुजरातमध्ये सर्वाधिक कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत. या राज्यात २६२ जणांचा या साथीत आतापर्यंत बळी गेला आहे, तर एकूण ५,०५४ रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी दिवसभरात गुजरातमध्ये २६ जणांचा बळी गेला, तर ३३३ नवे रुग्ण सापडले. गुजरातनंतर दिल्लीत सर्वाधिक ४१२२ रुग्ण आढळले आहेत.

कोरोनाच्या टेस्टिंगमध्ये वाढ झाल्याने रुग्णांचा संख्येत वाढ दिसत असल्याचे सांगितले जाते. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेने (आयसीएमआर) एका दिवसात ७२ हजार चाचण्या झाल्याची माहिती शनिवारी दिली होती. तर लवकरच एका दिवसात १.२५ लाख टेस्टिंग होऊ शकतील इतक्या प्रमाणात चाचण्या होतील, असे ‘आयसीएमआर’ने म्हटले आहे. देशभरात शनिवारपर्यंत १० लाख ४० हजार चाचण्या झाल्या आहेत. १ मे पासून शनिवार संध्याकाळपर्यंत १,३७,३४७ चाचण्या करण्यात आल्या. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारपर्यंत १६ लाख टेस्टिंग किट्स मिळाल्या आहेत. सरकारने मोठ्या प्रमाणात टेस्टिंग कीट्सची ऑर्डर दिली होती.

leave a reply