महाराष्ट्रात चोवीस तासात ४३ हजार नवे रुग्ण; २४९ बळी

- मुंबईत ८६४६ नव्या रुग्णांची नोंद

मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत गेल्या चोवीस तासात उच्चांकी वाढ झाली आहे. राज्यात एका दिवसात ४३ हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळले असून २४९ रुग्ण दगावले आहेत. यातील कोरोनाचे ८ हजार ६४६ नवे रुग्ण मुंबईतच आढळले आहेत. कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या पाहता राज्य सरकारने पुन्हा एकदा कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले. परिस्थिती नियंत्रणात येत नसेल, तर लॉकडाऊन लावावा लागेल, असे राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तर मुंबईच्या महापौरांनी मॉल, लोकल वाहतूकीवर निर्बंध आणि एक दिवसआड दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे स्पष्ट संकेत दिले आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्ण संख्येत भरमसाठ वेगाने वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसात सुमारे ८३ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवारी ४३ हजार १८३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबई महापालिका, ठाणे, नवी मुंबई, विरार-विसई, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, पनवेल, रायगड आणि पालघरमध्ये मिळून १४ हजार ७८६ नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच एकूण ३४ जण कोरोनाच्या साथीने दगावले आहेत.

महाराष्ट्रात एका दिवसात कोरोनाने सर्वाधिक बळी नागपूर मंडळात गेले आहेत. नागपूर मंडळात ६४ जण या साथीने दगावले असून ५ हजार ५७५ नव्या रुग्णांची नोंेद झाली. यामध्ये नागपूर पालिका क्षेत्रात २,५८७ रुग्ण आढळले असून ५० जण दगावले आहेत. ठाणे मंडळानंतर सर्वाधिक नवे रुग्ण पुणे मंडळात आढळले आहेत. पुणे मंडळात ९३०९ नव्या रुग्णांची नोंद झाली, तसेच २३ जणांचा या साथीमुळे मृत्यु झाला. लातूर मंडळात २,६८२, औरंगाबाद मंडळात २३२२, अकोला मंडळात १६७४ नवे रुग्ण आढळले आहेत, तर अनुक्रमे ३०, ४३, ६ जण दगावले आहेत.

दरम्यान, आता राज्यात निर्बंधांमध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील कोरोनाची साथ अटोक्यात येत नसून केंद्रीय आरोग्य विभागाने शुक्रवारी तातडीची बैठक बोलावली आहे. तर लॉकडाऊनचा निर्णय झाला नसला, तरी परिस्थिती बिघडल्यास दुसरा पर्याय नसेल, असे राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहेत. तसेच मुुंबईच्या महापौरांनी लोकल प्रवासावर पहिल्यासारखे निर्बंध आणले जातील, मॉल, थिएटर बंद केले जातील, दुकाने एक दिवस आड उघडली जातील, अशा प्रकारच्या कठोर उपयोजनांवर विचार होत असल्याचे स्पष्ट केले आहे.

मार्च महिन्यात ५५ हजार मुलांना कोरोनाची लागण

मार्च महिन्यात महाराष्ट्रात तब्बल ५५ हजार लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये १० वर्षांखालील १५,५०० मुलांचा समावेश आहे. गेल्या सहा महिन्यात लहान मुलांना इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले नव्हते. त्यामुळे जनतेला निष्काळजीपणे वागू नका, असे आवाहन सातत्याने करण्यात येत आहे.

महाराष्ट्रात एकट्या मार्च महिन्यात एकूण ६.५ लाख जणांना कोरोनाची लागण झाली. ऑक्टोबर ते फेब्रुवारीदरम्यान राज्यात एकूण ७.३ लाख कोरोनाच्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. मुंबईतच ८८,७१० रुग्णांची नोंद झाली आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत मुंबईतील रुग्णांची संख्या ४७५ टक्क्यांनी वाढली आहे. यावरून मार्च महिन्यात कोरोना संक्रमण किती वेगाने फैलावला आहे, हे स्पष्ट होते. नागरिकांकडून सोशल डिस्टंन्सिंग आणि मास्क लावणे यासारख्या नियमांचे पालन करण्यात येत नसल्याने कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात फैलावल्याचा ठपका ठेवण्यात येतो.

मार्च माहिन्यात महाराष्ट्रात आढळलेल्या एकूण रुग्णांमध्ये ५५ हजार अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. यामध्ये १० वर्षांखालील १५,५०० मुलांचा समावेश आहे, तर त्यापुढील ११ ते २० वर्षादरम्यानच्या ४० हजार मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. एका महिन्यात आढळलेल्या रुग्णांपैकी या दोन्ही वयोगटांमधील १० टक्के रुग्ण आहेत. २१ ते ३० वयोगटातील १७ टक्के, ३१ ते ४० वयोगटातील २२ टक्के, ४१ ते ५० वयोगटातील १८ टक्के कोरोना रुग्ण गेल्या एका महिन्यात आढळले आहेत.

leave a reply