नायजेरियात दरोडेखोरांच्या हल्ल्यात ४७ जण ठार

कानो – दरोडेखोरांनी नायजेरियाच्या कॅतसिना राज्यातील गावांमध्ये चढविलेल्या हल्ल्यात ४७ जण ठार झाले आहेत. अन्नधान्याची लूटमार करण्याच्या हेतूने हेे हल्ले चढविण्यात आले, अशी माहिती नायजेरियन पोलिसांनी दिली आहे. गेल्या वर्षीदेखील दरोडेखोरांनी याच भागातील गावांमध्ये अशाच प्रकारे हल्ला चढवून शंभर जणांना ठार केले होते.

आफ्रिका खंडातील गरीब व मागासलेल्या नायजेरियामध्येही कोरोनाव्हायरसचा फैलाव वाढत आहे. अशावेळी नायजेरियन सरकारकडून गावागावात अन्नधान्याचे वाटप केले जात आहे. याची माहिती मिळताच सुमारे ३०० दरोडेखोरांनी कॅतसिना राज्यातील दुतसेनमा, दानमुसा आणि सफाना गावांंवर हल्ला चढविला. त्यावेळी झालेल्या संघर्षात ४७ जणांचा बळी गेला.

या हल्ल्यांची माहिती मिळाल्यानंतर नायजेरियन पोलिसांनी जवळच्या जंगलामध्ये या दरोडेखोरांसाठी शोधमोहीम सुरू केली आहे. नायजेरियाचे राष्ट्रपती मोहम्मद बुहारी यांनी या हल्ल्यावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. नायजेरियन पोलिसांनी या गावांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. जानेवारी महिन्यापासून कॅतसिना राज्यातील गावांमध्ये दरोडेखोरांनी केेेलेल्या हल्ल्यात २०० जण मारले गेेले आहेत. फेब्रुवारी महिन्यात दोन खेड्यांमध्ये दरोडेखोरांनी टाकलेल्या दरोड्यात तीस जण ठार झाले होते.

leave a reply