जम्मू-काश्मीरमध्ये ‘हिजबुल’च्या पाच दहशतवाद्यांना अटक

श्रीनगर – जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये सुरक्षादलांनी केलेल्या कारवाईत हिजबुल मुजाहिदीन मॉड्युल उध्वस्त करण्यात आले असून पाच दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र जप्त करण्यात आली आहेत. दोन दिवसापूर्वी सुरक्षादलांनी लश्कर-ए- तोयबाच्या सहा ओव्हर ग्राउंड वर्करला अटक केली होती.

Jammu-Kashmirमंगळवारी सुरक्षादलांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे कुपवाडामधील लोपरा आणि लोलब भागात शोधमोहीम हाती घेतली होती. यादरम्यान ‘हिजबुल‘च्या पाच दहशतवाद्यांना अटक करण्यात यश मिळाले. परवेझ अहमद भट (22), अल्ताफ अहमद मीर (35), जि. एच मोहद (35), नझीमुद्दीन गुर्जर (44) आणि अब्दुल कयूम (29) अशी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत.

याआधी शनिवारीच जम्मू काश्मीरच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपने (एसओजी) लश्कर-ए-तोयबाच्या सहा दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. टेरर फंडिंग प्रकरणी या सर्वाना अटक झाली आहे. काही दिवसापूर्वी मुद्सीर फारुख भट या दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती. भटच्या चौकशीत त्याचे संबंध लश्कर बरोबर असल्याचे समोर आलेले होते. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करत या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली.

गेल्या काही महिन्यापासून दहशतवादी संघटना आणि त्यांना सहाय्य करणाऱ्यांविरोधात कारवाई हाती घेण्यात अली आहे. त्याचबरोबर दहशवाद्यांना मिळणारे आर्थिक सहाय्य रोखण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येत आहे. यावर्षात आतापर्यंत १५० दहशतवाद्यांना ठार झाले आहेत. सुरक्षादलाच्या कारवाईमुळे सध्या दहशतवादी संघटना नेतृत्वहीन झाल्या आहेत. हिजबुल मुजाहिदीनचेच सुमारे ५० दहशतवादी ठार झाले आहेत. सुरक्षादलाच्या कारवाईमुळे दहशतवादी संघटनांना जबर हादरा बसला आहे.

leave a reply