जम्मू-काश्मीरमध्ये ‘लश्कर’चे पाच दहशतवादी चकमकीत ठार – एका जवानाला वीरमरण

जम्मू – जम्मूच्या हवाईतळावर ड्रोनद्वारे झालेल्या दहशतवादी हल्यानंतर जम्मू-काश्मिरमधील दहशतवाद्यांविरोधातील कारवाई अधिकच तीव्र करण्यात आली आहे. बुधवारी कुलगामध्ये ‘लश्कर-ए-तोयबा’च्या तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. तर शुक्रवारी पुलवामामध्ये चकमकीत ‘लश्कर’चे आणखी पाच दहशतवादी सुरक्षादलांबरोबरील चकमकीत ठार झाले. या कारवाईदरम्यान एका जवानाला वीरमरण आले आहे. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी हवाईतळावर झालेल्या ड्रोन हल्ल्यामागे ‘लश्कर’ किंवा ‘जैश-ए-मोहम्मद’चा हात असल्याची शक्यता व्यक्त केली होती. या पार्श्‍वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये तीन दिवसात ‘लश्कर’चे आठ दहशतवादी चकमकीत ठार झाल्याने या कारवाईचे महत्त्व वाढते.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामाच्या हांजिन राजपोरा भागात काही दहशतवादी दिसून आल्याची माहिती सुरक्षादलांना मिळाली होती. त्यानंतर गुरुवारी मध्यरात्री सुरक्षादलांकडून संयुक्त मोहिम हाती घेत या भागाला वेढा देण्यात आला व घराघरात जाऊन शोध मोहिम सुरू झाली. यादरम्यान दहशतवादी आणि सुरक्षादलांचा आमनासामना झाला. दहशतवाद्यांनी सुरक्षादलांच्या जवानांना पाहताच गोळीबार सुरू केला. त्यानंतर मोठी चकमक सुरू झाली. सुमारे सात तास ही चकमक सुरू होती.

दहशतवाद्यांनी सुरुवातीला केलेल्या गोळीबारात एक जवान गंभीर जखमी झाला होता. या जवानाला नंतर वीरमरण आल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली. शुक्रवार दुपारपर्यंत ही चकमक सुरू होती. सुरक्षादलांना या ठिकाणाहून पाच दहशतवाद्यांचे मृतदेह मिळाले आहेत. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये निशाज लोण ऊर्फ खिताब हा पुलवामातील ‘लश्कर’चा कमांडर होता. तर एका दहशतवाद्याची ओळख अद्याप पटली नसून तो पाकिस्तानी असल्याचे समोर येत आहे. पुलवामाच्या हांजिन राजपोरामध्ये दहशतवादी संघटनेत तरुणांची भरती करण्यासाठी हे दहशतवादी जमा झाले होते, अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधातील कारवाई तीव्र करण्यात आली आहे. त्याचवेळी ड्रोनसारख्या धोक्यांशी सामना करण्याकरीता सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात येत आहेत. शुक्रवारीही जम्मू-काश्मीरमध्ये एक ड्रोन दिसून आले होते. हवाईतळावर झालेल्या ड्रोन हल्ल्यांमागेही लश्कर-ए-तोयबा किंवा जैश सारख्या संघटना असण्याची शक्यता आहे. कारण या संघटना शस्त्र व अमली पदार्थ तस्करीकरीता ड्रोनचा वापर सतत करीत राहिल्या आहेत, असे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी म्हटले आहे.

leave a reply