50 देशांना भारताच्या ‘को-विन’ यंत्रणेत स्वारस्य – भारत मोफत सॉफ्टवेअर देण्यास तयार

‘को-विन’नवी दिल्ली – जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम म्हणून भारतात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेकडे पाहिले जात आहे. सव्वा अब्जाहून अधिक लोकसंख्येच्या देशात एवढी मोठी मोहिम राबविताना भारत को-विन या ऑनलाईन व्यासपीठाचा वापर करीत आहे. या ऑनलाईन पोर्टलद्वारे लसीकरणाबाबत रियल टाईम डाटा ठेवून ही प्रचंड व्यवस्था हाताळण्याचे काम भारतात होत असून यामुळे कित्येक देशांना अशी यंत्रणा उभारून हवी आहे. सुमारे 50 देशांनी भारताच्या ‘को-विन’सारख्या यंत्रणेत स्वारस्य दाखविले आहे, अशी माहिती कोविड-19 लसीकरण व्यवस्थापन गटाचे अध्यक्ष डॉ.आर.एस. शर्मा यांनी दिली आहे. त्याचवेळी भारत या देशांना असे ओपन सोर्स सॉफ्टवेअर मोफत देण्यासाठी तयार असल्याचे डॉ. शर्मा यांनी अधोरेखित केले.

आशिया, दक्षिण अमेरिका, आफ्रिकेतील कितीतरी देशांनी भारताकडे ‘को-विन’सारखी यंत्रणा उभारून देण्याची मागणी केली आहे. यामध्ये कॅनडा, मेक्सिको, पनामा, पेरू, अझरबैजान, युक्रेन, नायजेरीया, युगांडा, व्हिएतनाम, इराक, डॉमनिका, युएईसारख्या देशांचा समावेश आहे. या देशांना त्याच्ैंया देशात लसीकरण मोहीम राबविण्यासाठी ‘को-विन’सारखी यंत्रणा हवी आहे.

भारतात आतापर्यंत 30 कोटीहून अधिक जणांची लसीकरणासाठी नोंदणी को-विनद्वारे झाले आहे, याकडे लक्ष वेधताना याद्वारे ही यंत्रणा किती यशस्वीरित्या काम करीत आहे, हे आपण सार्‍या जगाला दाखवून दिले आहे, असे शर्मा म्हणाले. सव्वाशे कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशात लसीकरण मोहीम राबविणे सोपी गोष्ट नाही. को-विनसारखे ऑनलाईन व्यासपीठ यासाठी तयार करून भारताने आपली डिजिटल यंत्रणा विकसित करण्याची क्षमता जगाला दाखविल्याचेही डॉ. शर्मा यांनी यावेळी अधोरेखित केले. आरोग्य आणि तंत्रज्ञान तंज्ञाच्या एक व्हर्च्युअल जागतिक परिषद 5 जुलै रोजी होणार आहे. भारत या परिषदेत को-विन यंत्रणा कशी काम करते हे सर्वांसाठी खुले करील, असे डॉ. शर्मा यांनी जाहीर केले.

leave a reply