पीओके’मध्ये पाकिस्तानच्या ५२ जवानांचा कोरोनाने मृत्यू – सुमारे अडीच हजार जवानांना कोरोनाची लागण

इस्लामाबाद/ मुझफ्फराबाद – ‘पीओके’ आणि गिलगिट बाल्टिस्तानमध्ये तैनात असलेल्या पाकिस्तानी लष्कराचे ५२ जवान कोरोनामुळे मृत्यूमूखी पडले आहेत. तसेच या साथीची लागण झालेल्या अडीच हजार पाकिस्तानी जवानांपैकी ८२७ जणांवर अद्याप उपचार सुरु असल्याची बातमी आहे. आतापर्यंत पाकिस्तानने ही बातमी दडवून ठेवली होती. पण पीओकेमध्ये तैनात असलेल्या जवानांमध्येच पाकिस्तानी सरकारविरोधात नाराजीचे सूर उमटल्यानंतर ही बातमी उघड झाली .

कोरोनाने मृत्यू

पीओके व गिलगिट बाल्टिस्तानमध्ये तैनात असलेल्या पाकिस्तानच्या लष्करच्या जवानांमध्ये कोरोनाव्हायरसची साथ वेगाने पसरत आहे. सामान्य जवानांना वैद्यकीय उपचार मिळत नसून फक्त लष्कराच्या अधिकांऱ्यावरच उपचार होत असल्याचे आरोप होत आहेत. कोरोना झालेल्या जवानांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने या जवानांमध्ये असंतोष आहे.

अखेरीस हिम्मत दाखवून एका पाकिस्तानी लष्कराच्या युनिटमधील काही जवानांनी निर्दशने केली. तसेच पीओकेतील नागरिकांनीही पाकिस्तान सरकारविरोधात निदर्शने केली. पाकिस्तानी लष्कर जाणूनबुजून कोरोनाव्हायरसचे रुग्ण पीओकेमध्ये धाडत आहे, अशी टीका स्थानिक करीत आहेत. पाकिस्तानने पीओकेमध्ये क्वारंटाईन सेंटर्स उभारले आहे. त्यामुळे पीओकेमध्ये कोरोनाव्हायरसची साथ झपाट्याने पसरत आहे. आता पीओकेच्या पाकिस्तानी लष्कराच्या युनिटमध्ये जवानांनाच याची लागण झाल्यावर सर्वत्र खळबळ उडाली आहे.

पाकिस्तानी लष्कर जम्मू आणि काश्मीरच्या नियंत्रणरेषेवरुन या साथीची लागण झालेल्यांना काश्मीरमध्ये धाडत असल्याचा आरोप भारतीय लष्कराच्या अधिकांऱ्यानी केला होता. येथील दहशतवादी तळावरील दहशतवाद्यांमध्येही कोरोनाची साथ पसरली आहे. कित्येक दहशतवाद्यांना कोरोना झाल्याच्या बातम्या आल्या होत्या.

सध्या, पाकिस्तामध्ये कोरोनाची साथ अतिशय वेगाने पसरत आहे. पाकिस्तानमध्ये या साथीने बळी गेलेल्यांची संख्या ४,७१२ वर गेली असून दोन लाख २८ हजार जणांना या साथीची लागण झाली आहे. मात्र या घोषित संख्येपेक्षा पाकिस्तानमध्ये या साथीने विक्राळ रूप घेतले आहे. त्यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर टीका होत आहे. मात्र सरकार हे सारे दडविण्याचा प्रयत्न करीत जाणूनबुजून असून पाकिस्तानात चाचण्या कमी करण्यात येत आहेत, असे आरोप होत आहेत. पाकिस्तानच्या संसदेतील १०० खासदारांना या साथीची लागण झाल्याची माहिती उघड झाली होती. तसेच पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री आणि रेल्वेमंत्रीही कोरोनाबाधित बनले आहेत.

दरम्यान, पीओकेच्या महासंचालकांच्या वेबसाईटवरून पाकिस्तान व्याप्त काश्मीरच्या जनतेला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य हवे आहे., असा संदेश झळकला होता. गेली ७० वर्षे पाकिस्तानचे लष्कर पीओकेमध्ये जनतेचा छळ करीत आहे, असेही या संदेशात म्हटले होते. यामुळे खळबळ माजली होती. कालांतराने ही वेबसाईट हॅक झाल्याचे माहिती पाकिस्तान सरकारने दिली.

leave a reply