अमेरिका व कॅनडात ‘हिटवेव्ह’चे सुमारे सहाशे बळी – कॅनडातील वणव्यात लिटन शहर जळून खाक

वॉशिंग्टन/ओटावा – अमेरिका व कॅनडाला बसलेल्या ‘हिटवेव्ह’च्या फटक्यात सुमारे 600 जणांचा बळी गेला आहे. कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया प्रांतात सहा दिवसांमध्ये किमान 486 जणांचा मृत्यू झाला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे लागलेल्या वणव्यात कॅनडातील लिटन शहर 90 टक्क्यांहून अधिक जळाल्याचे समोर आले आहे. तर अमेरिकेतील ओरेगॉन व वॉशिंग्टन या दोन प्रांतांमध्ये 100 जणांचा बळी गेला असून बळींची संख्या वाढण्याची भीती स्थानिक यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

पॅसिफिक महासागर क्षेत्रातील ‘पॅसिफिक नॉर्थवेस्ट’ म्हणून ओळखण्यात येणार्‍या क्षेत्रात ‘हिट डोम’ तयार झाल्याने तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. अमेरिकेच्या वायव्य भागात तसेच कॅनडाच्या पश्‍चिम भागातील प्रांतांमध्ये 40 डिग्री सेल्सियस व त्यापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली असून हा या भागातील ‘रेकॉर्ड’ मानला जातो.

उष्णतेच्या या लाटेमुळे कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया भागात गेल्या सहा दिवसात सुमारे 486 बळींची नोंद झाली आहे. यातील दोन तृतियांश मृत्यू ज्येष्ठ नागरिकांचे असल्याची माहिती आरोग्य यंत्रणांनी दिली. वाढत्या तापमानामुळे ब्रिटीश कोलंबिया प्रांतातील काही भागांमध्ये तीव्र वणवे पेटले आहेत. लिटन हे शहर 90 टक्क्यांहून अधिक जळाल्याचे समोर आले आहे. बुधवारी या शहरातील स्थिती एखाद्या ‘वॉरझोन’प्रमाणे होती, अशी माहिती स्थानिकांनी दिली. लिटनव्यतिरिक्त इतर भागातही वणवे पेटले असून शेकडो नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे.

अमेरिकेतील ओरेगॉन व वॉशिंग्टन स्टेट या प्रांतामध्येही उष्णतेच्या लाटेची तीव्रता वाढत असल्याचे सांगण्यात येते. ओरेगॉनमध्ये गेल्या काही दिवसात सुमारे 80 जणांचा बळी गेला आहे. त्यातील 45 बळी एकट्या ‘मुल्टनोमाह कौंटी’ भागातील असल्याचे सांगण्यात येते. वॉशिंग्टन स्टेट प्रांतातही 20 बळींची नोंद झाली असून पुढील काळात संख्या वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

leave a reply