महाराष्ट्रात चोवीस तासात कोरोनाचे ६० हजार नवे रुग्ण

- ३२२ जणांचा बळी

नवी दिल्ली/मुंबई – महाराष्ट्रात एका दिवसात आढळणार्‍या कोरोनाच्या रुग्ण संख्येने पुन्हा नवा उच्चांक गाठला आहे. चोवीस तासात महाराष्ट्रात कोरोनाचे ६० हजार नवे रुग्ण आढळले असून ३२२ जणांचा बळी गेला. महाराष्ट्रातील ऍक्टिव्ह केसेसची संख्या ५ लाखांच्या पुढे गेली आहे. देशात कोरोनाच्या ऍक्टिव्ह केसेसची संख्या ८ लाखांच्या पुढे गेली आहे. यातील ७० टक्के ऍक्टिव्ह केसेस केवळ महाराष्ट्रात आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी महाराष्ट्रातील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करताना ही परिस्थिती अधिक चांगल्या पद्धतीने हाताळायला हवी, असे म्हटले आहे.

महाराष्ट्रात कोरोनाच्या साथीने भयंकर रुप धारण केले आहे. मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण आढळत असून यामुळे वाढत असलेल्या मृत्युनेही चिंता वाढविल्या आहेत. बुधवारी पुन्हा एकदा महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. ५९ हजार ८०० नव्या रुग्णांची नांेंद चोवीस तासात झाली असून मुंबई महापालिका क्षेत्रात सुमारे १०५०० नवे रुग्ण आढळले आहेत. पुणे मंडळातही १० हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. नागपूरमध्ये परिस्थिती भयावह बनली असून ५ हजार ३३८ नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच ६६ रुग्णांचा बळी गेला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक बळी नागपूर मंडळात जात आहेत.

दरम्यान, मंगळवारपासून बुधवारच्या सकाळपर्यंतच्या चोवीस तासात १ लाख १५ हजार नवे रुग्ण आढळले होते. यातील ४५ टक्के रुग्ण महाराष्ट्रातील होते. महाराष्ट्रात मंगळवारी कोरोनाच्या ५५ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली होती. पण महाराष्ट्रसह दिल्ली, पंजाब, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेशामधील परिस्थितीही बिघडत चालली असून येथेही रुग्ण संख्येत उच्चांकी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. या पार्श्‍वभूमीवर येथील राज्य सरकारांनी कडक निर्बंधांची घोषणा केली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसिकरणाचा वेग वाढविण्यासाठी ४५ वर्षांवरील १०० पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या कंपन्यांमध्येच तात्पुरते लसीकरण केंद्र उघडण्याची परवानगी दिली आहे. अशा मोठ्या कंपन्यांमध्ये ११ एप्रिलपासून तेथे जाऊन लसीकरण सुरू करण्याचे निर्देश आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत व यासाठी राज्यांना तयार राहण्यास सांगितले आहे.

बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयांनीही कोरोनाची परिस्थिती देशात भयंकर असल्याचे सांगत मास्क न लावणार्‍यांवर कडक कारवाईचे निर्देश दिले. मास्क हे सुरक्षा कवच असल्याचे न्यायालयाने म्हटले असून एखाद्या वाहनात एकटा माणूस असला, तरीही त्याला मास्क लावावे लागेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

leave a reply