अमेरिकेच्या कोलोरॅडो प्रांतातील मास शूटिंगच्या घटनेत सात जणांचा बळी – ‘गन कंट्रोल’चा मुद्दा ऐरणीवर

कोलोरॅडो – अमेरिकेच्या कोलोरॅडो प्रांतात रविवारी करण्यात आलेल्या बेछूट गोळीबाराच्या घटनेत हल्लेखोरासह सात जणांचा बळी गेला. कोलोरॅडो प्रांतात गेल्या दोन महिन्यात घडलेली मास शूटिंगची ही दुसरी घटना आहे. कोलोरॅडोतील घटनेनंतर अमेरिकेत ‘गन कंट्रोल’चा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून सत्ताधारी डेमोक्रॅट पक्षाच्या सदस्यांकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्याचवेळी अमेरिकेतील जवळपास ३५ टक्के नागरिकांनी आपल्याकडील बंदुका व इतर शस्त्रांचा साठा वाढविल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

कोलोरॅडो

रविवारी कोलोरॅडो स्प्रिंग्ज भागातील एका पार्कमध्ये समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी एका अज्ञात हल्लेखोराने समारंभात घुसून बेछूट गोळीबार सुरू केला. या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर हल्लेखोराने स्वतःवरही गोळी झाडल्याचे व त्यात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. हल्लेखोर समारंभात सहभागी असणार्‍या एका महिलेचा मित्र होता, असा दावा करण्यात आला आहे. मात्र पोलिसांनी हल्लेखोर तसेच मृतांची नावे अद्यापही उघड केलेली नाहीत.

कोलोरॅडोयावर्षी कोलोरॅडो प्रांतात घडलेली ही मास शूटिंगची दुसरी मोठी घटना ठरली आहे. यापूर्वी मार्च महिन्यात एका २१ वर्षीय तरुणाने ‘किंग सुपर्स’ या दुकानात केलेल्या गोळीबारात पोलीस अधिकार्‍यासह १० जणांचा बळी गेला होता. या घटनेवर अमेरिकेतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी, मास शूटिंगच्या घटना अमेरिकेसाठी अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचे म्हटले होते. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी बंदुकांच्या वापरावर नियंत्रण आणण्यासाठी अध्यादेशही जारी केले होते. कोलोरॅडो प्रांतातील विधिमंडळात ‘गन कंट्रोल’च्या मुद्यावर प्रस्तावही दाखल करण्यात आला होता.

रविवारी घडलेल्या घटनेनंतर अमेरिकेत पुन्हा एकदा ‘गन कंट्रोल’चा मुद्दा ऐरणीवर आला आहे. डेमोक्रॅट पक्षाच्या संसद सदस्यांनी, राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी आक्रमक भूमिका घेण्याची मागणी केली आहे. त्याचवेळी संसदेत यासंदर्भात विधेयक आणण्याच्या हालचालींनाही वेग दिला आहे. मात्र रिपब्लिकन पक्षाने त्याला तीव्र विरोध दर्शविला आहे.

दरम्यान, अमेरिकेत मास शूटिंगच्या घटना वाढत असतानाच बंदुका व इतर शस्त्रांच्या विक्रीतही वाढ होत असल्याचे समोर आले आहे. ‘रासमुसेन’ या गटाने केलेल्या एका सर्वेक्षणात, गेल्या काही महिन्यात ३५ टक्के अमेरिकी नागरिकांनी आपल्याकडील बंदुकांच्या साठ्यात अधिक भर घातल्याचे समोर आले आहे. अमेरिकेतील काही भागांमध्ये दुकानांमधील बंदुकांचे साठे संपल्याच्या घटनाही उघड झाल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी अमेरिकी तपासयंत्रणा ‘एफबीआय’ने दिलेल्या अहवालात, २०२० साली अमेरिकेतील बंदुकांची विक्री तब्बल ३४ टक्क्यांनी वाढल्याचे सांगण्यात आले होते. त्याचवेळी जानेवारी २०२१मध्ये अमेरिकेत जवळपास ४१ लाख बंदुकांची विक्री झाल्याचेही समोर आले होते.

leave a reply