अफगाणिस्तानातील तालिबानच्या वर्चस्वानंतर पाकिस्तानातील ‘तेहरिक’च्या हल्ल्यांमध्ये वाढ

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या वझिरिस्तान प्रांतात ‘तेहरिक-ए-तालिबान’च्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानी लष्करावर चढविलेल्या हल्ल्यात सात जवान ठार झाले. तालिबानने काबुलचा ताबा घेतल्यानंतर ‘तेहरिक’ने पाकिस्तानात घडविलेला हा पाचवा मोठा दहशतवादी हल्ला ठरतो. तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर पाकिस्तानातील तेहरिकच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. असे असूनही पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री कुरेशी यांनी पाकिस्तान तेहरिकला माफी द्यायला तयार असल्याची घोषणा केली. त्यावर पाकिस्तानात जळजळीत प्रतिक्रिया येत आहेत.

अफगाणिस्तानातील तालिबानच्या वर्चस्वानंतर पाकिस्तानातील ‘तेहरिक’च्या हल्ल्यांमध्ये वाढअफगाणिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या वझिरिस्तान तसेच बलोचिस्तान या प्रांतात तेहरिक-ए-तालिबानच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. तेहरिकचे दहशतवादी पाकिस्तानच्या लष्कराला लक्ष्य करीत आहेत. आठवड्यापूर्वी तेहरिकच्या दहशतवाद्यांनी बलोचिस्तानमध्ये लष्करावर चढविलेल्या हल्ल्यात तीन जवान ठार झाले होते. तर त्यानंतर वझिरिस्तानातील हल्ल्यात सात जवान मारले गेले होते. तेहरिकच्या हल्ल्यांसमोर पाकिस्तानी जवानांनी पळ काढल्याचे दावेही करण्यात आले होते.

या वर्षात तेहरिकच्या हल्ल्यांमध्ये १४० पाकिस्तानी जवान मारले गेले. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत ही मोठी वाढ असल्याचा दावा केला जातो. अफगाणिस्तानात पाकिस्तान समर्थक तालिबानची राजवट आल्यानंतर तेहरिकच्या हल्ल्यांमध्ये झालेली ही वाढ चिंतेची बाब असल्याचे पाकिस्तानी पत्रकारांचे म्हणणे आहे. तेहरिकच्या मुद्यावर तालिबान पाकिस्तानचे ऐकून घ्यायला तयार नसल्याची टीका हे पत्रकार करीत आहेत.अफगाणिस्तानातील तालिबानच्या वर्चस्वानंतर पाकिस्तानातील ‘तेहरिक’च्या हल्ल्यांमध्ये वाढ

अशा परिस्थितीत, परराष्ट्रमंत्री कुरेशी यांनी तेहरिकच्या दहशतवाद्यांना माफी देण्याची घोषणा केल्यामुळे पाकिस्तानी माध्यमांमधून त्यांच्यावर टीका होत आहे. पाकिस्तानच्या यंत्रणांशी कुठल्याही प्रकारची चर्चा शक्य नसल्याचे तेहरिकने स्पष्ट केले आहे. तसेच अफगाणिस्तान व पाकिस्तानला विभागणारी ड्युरंड लाईन देखील जुमानत नसल्याचे तेहरिकने खडसावले होते. यावरुन तेहरिक पाकिस्तानच्या लष्कराला आव्हान देत असल्याचे उघड आहे.

अशा परिस्थितीत, कुरेशी तेहरिकच्या दहशतवाद्यांसमोर माघार घेत असल्याचा आरोप पाकिस्तानी माध्यमांमधून होत आहे. त्याचबरोबर जगातील सर्वात सामर्थ्यशाली लष्कर तेहरिकसमोर का माघार घेते, असा सवाल पाकिस्तानी पत्रकार करू लागले आहेत.

leave a reply