अमेरिकन परराष्ट्रमंत्र्यांच्या गंभीर आरोपानंतरही पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून तालिबानची वकिली

इस्लामाबाद – अफगाणिस्तानात तालिबानला साथ देऊन अमेरिकेचा विश्‍वासघात करणार्‍या पाकिस्तानला धडा शिकविण्याची मागणी अमेरिकेच्या संसदेत केली जात आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी पाकिस्तानवरील या आरोपांना दुजोरा देऊन पाकिस्तानबरोबरील संबंधांवर बायडेन प्रशासन फेरविचार करीत असल्याचे म्हटले होते. याच्या भयंकर परिणामांची जाणीव झालेले पाकिस्तानातील सुजाण विश्‍लेषक व पत्रकार धास्तावले आहेत. मात्र पाकिस्तानच्या पंतप्रधान इम्रान खान यांनी ब्लिंकन यांना अफगाणिस्तानचा थांगपत्ता नसून त्यांची विधाने बेपर्वाईची असल्याचे शेरे मारले आहेत.

अमेरिकन परराष्ट्रमंत्र्यांच्या गंभीर आरोपानंतरही पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून तालिबानची वकिलीएका अमेरिकन वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी पुन्हा एकदा तालिबानची वकिली केली. जगाने तालिबानबरोबर वाटाघाटी करून त्यांना महिलांच्या अधिकार जपण्यासाठी व सर्वसामावेशक सरकारसाठी उत्तेजन द्यावे, अशी मागणी इम्रान खान यांनी केली. तसेच अफगाणिस्तानात स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी तालिबानला वेळ द्यायला हवा, असा दावा इम्रान खान यांनी केला. मात्र जर तसे झाले नाही आणि अफगाणिस्तानात पुन्हा अस्थैर्य माजले तर ते जगाला परवडणारे नाही, असा धमकावणीचा सूर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी लावला आहे.

अफगाणिस्तानात अमेरिकेच्या सैनिकांना ठार करणार्‍या हक्कानी नेटवर्कला पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयने सहाय्य केल्याचे आरोप होत आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही पाकिस्तान अमेरिकेच्या अफगाणिस्तानातील हितसंबंधांविरोधात काम करीत असल्याचा ठपका ठेवला. तसेच गेल्या वीस वर्षांपासून पाकिस्तान दहशतवाद्यांना सहाय्य करीत असल्याच्या आरोपांना दुजोरा दिला. पण त्यांचे हे आरोप याआधी कधीही ऐकले नव्हते, इतके बेजबाबदार असल्याचा दावा इम्रान खान यांनी या मुलाखतीत केला. ‘‘सोव्हिएत रशियाने अफगाणिस्तानवर हल्ला चढविल्यानंतर पन्नास लाख अफगाणी निर्वासित पाकिस्तानात दाखल झाले. यात हक्कानी या अफगाणिस्तानातील टोळीचाही समावेश होता. सुरूवातीच्या काळात या निर्वासितांमधूनच अमेरिकेने सोव्हिएत रशियाच्या फौजेशी लढण्यासाठी ‘मुजाहिद’ तयार केले’’, असे सांगून इम्रान खान यांनी हक्कानी नेटवर्कच्या दहशतवादी कारवायांची जबाबदारी थेट अमेरिकेवरच टाकली.

तसेच पाकिस्तानवर अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलेल्या आरोपांवर पंतप्रधान इम्रान खान यांनी नाराजी व्यक्त केली. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांना अफगाणिस्तानचा थांगपत्ता नाही व ते बेपर्वाईने बोलत असल्याची टीका इम्रान खान यांनी केली. इम्रान खान यांच्या मुलाखतीचे पाकिस्तानातील काहीजणांनी स्वागत केले आहे. त्यांनी अमेरिकेवर केलेली टीका योग्यच ठरते, असे पाकिस्तानच्या माध्यमांमधील एका गटाचे म्हणणे आहे. पण इम्रान खान यांनी तालिबानची वकिली करून पुन्हा एकदा पाकिस्तानसमोरील अडचणी वाढविल्याची चिंता काही पत्रकार व विश्‍लेषकांनी व्यक्त केली आहे.

अमेरिकन परराष्ट्रमंत्र्यांच्या गंभीर आरोपानंतरही पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून तालिबानची वकिलीतालिबानला मान्यता द्यायची की नाही, त्याचा निर्णय जगभरातील इतर देशांनी घ्यायचा आहे. त्याबाबत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी सल्ले देण्याचे काहीच कारण नाही. आधीच अफगाणिस्तानातील तालिबानच्या ताब्याला पाकिस्तान जबाबदार असल्याचे आरोप होत आहेत. अशा परिस्थितीत तालिबानची बाजू घेऊन पंतप्रधानांनी पाकिस्तानला अधिकच बदनाम केले आहे, असा ठपका पाकिस्तानच्या एका विश्‍लेषकाने ठेवला. इतकेच नाही तर अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पाकिस्तानवर केलेल्या टीकेला उत्तर देण्याची पंतप्रधान इम्रान खान यांना आवश्यकता नव्हती, असे या विश्‍लेषकाचे म्हणणे आहे.

अमेरिका पाकिस्तानवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थितीत आक्रमक विधाने करून पाकिस्तानचे पंतप्रधान अमेरिकेला चिथावणी देत असल्याची चिंता एका पाकिस्तानी पत्रकाराने व्यक्त केली. पण पंतप्रधान इम्रान खानच नाही तर पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांनी देखील तालिबानला मान्यता देण्यासाठी विलंब करणार्‍या देशांवर टीका केली आहे. अफगाणिस्तानात तालिबान काय करते, त्यावर नजर ठेवून शांतपणे याबाबत निर्णय घेण्याचे ‘वेट अँड वॉच’ धोरण घातकी ठरेल. कारण अफगाणिस्तानात आर्थिक संकटात असून हा देश कोसळण्याची शक्यता आहे, असा दावा मोईद युसूफ यांनी केला. ९०च्या दशकात अशीच चूक झाली होती, याची आठवण युसूफ यांनी करून दिली.

९० च्या दशकात अफगाणिस्तानकडे दुर्लक्ष झाल्यानंतर अमेरिकेवर ९/११चा हल्ला झाला होता, याकडे मोईद युसूफ अप्रत्यक्षपणे लक्ष वेधत आहेत. याआधीही त्यांनी अफगाणिस्तानात अस्थैर्य माजल्यास ९/११सारखा दुसरा हल्ला होईल, असे धमकावले होते. त्यामुळे पाकिस्तानचे अफगाणिस्तानबाबतचे धोरण धमकावण्याचेच असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी अमेरिकी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीची सोशल मीडियावर खिल्ली उडविली जात आहे. इम्रान खान दावा करतात, त्याप्रमाणे खरोखरच हक्कानी टोळी अफगाणिस्तानात आहे का आणि त्यांचा हक्कानी नेटवर्कच्या दहशतवाद्यांशी संबंध आहे का, असे प्रश्‍न सोशल मीडियावर विचारण्यात आले आहेत.

पाकिस्तानच्या नौशेरामध्ये असलेल्या अकोरा खटक येथील हक्कानिया मदरसा येथे धार्मिक शिक्षण घेणार्‍या जलालुद्दीन याला या मदरशामुळे हक्कानी हे नाव मिळाले, अशी माहिती पाकिस्तानचे अमेरिकेतील माजी राजदूत हुसेन हक्कानी यांनी दिली. हाच न्याय लावायचा तर, ऑक्सफर्डमध्ये शिकलेल्या इम्रान खान यांना ऍचिसन अँड ऑक्सफर्ड टोळीचे म्हणायचे का? असा टोला हुसेन हक्कानी यांनी लगावला आहे.

leave a reply