उघुरवंशियांच्या मुद्यावर ४०हून अधिक देशांचे चीनवर टीकास्त्र

- संयुक्त राष्ट्रसंघटनेत झालेल्या टीकेने चीन अस्वस्थ

टीकास्त्रन्यूयॉर्क/बीजिंग – ‘झिंजिआंग प्रांतात चीनकडून मोठ्या प्रमाणात व पद्धतशीरपणे मानवाधिकारांचे उल्लंघन करण्यात येत आहे. उघुरवंशियांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आले असून त्यांच्यावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. उघुरवंशियांसह इतर अल्पसंख्याकांवर चुकीच्या पद्धतीने टेहळणी करण्यात येत आहे’, अशा आक्रमक शब्दात ४०हून अधिक देशांनी चीनच्या कम्युनिस्ट राजवटीवर टीकास्त्र सोडले आहे. संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या बैठकीत झालेल्या या आरोपांमुळे चीन अस्वस्थ बनला असून चीनने हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.

काही वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या एका बैठकीतच चीनच्या कम्युनिस्ट राजवटीकडून तब्बल ११ लाख उघुरवंशियांना छावण्यांमध्ये डांबून ठेवण्यात आल्याचे उघड झाले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदात उघुरवंशियांच्या मुद्यावरून चीनविरोधात अधिकाधिक आक्रमक होत असल्याचे समोर येत आहे. चार महिन्यांपूर्वी जीनिव्हात संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या मानवाधिकार आयोगाच्या बैठकीत, चीनने संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या अधिकार्‍यांसह निष्पक्ष निरीक्षकांना झिंजिआंगमध्ये प्रवेश द्यावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली होती.

त्यानंतर पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रसंघटनेत उघुरवंशियांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. या वर्षात संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या व्यासपीठावर उघुरवंशियांच्या मुद्यावरून चीनला लक्ष्य करण्याची ही तिसरी वेळ ठरली आहे. मे महिन्यात, संयुक्त राष्ट्रसंघटनेने झिंजिआंगमधील उघुरवंशिय व इतर अल्पसंख्य समुदायावर होणार्‍या अत्याचारांच्या मुद्यावर बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर जून महिन्यात जीनिव्हात झालेल्या बैठकीतही उघुरवंशियांच्या मुद्यावरून चीनला फटकारण्यात आले होते.

टीकास्त्रया आठवड्यात झालेल्या बैठकीत, संयुक्त राष्ट्रसंघटनेतील ४३ आघाडीच्या देशांनी एक निवेदन प्रसिद्ध करून चीनच्या कारवायांकडे लक्ष वेधले. यात अमेरिका व युरोपिय देशांसह काही आशियाई देशांचाही समावेश आहे. चीनने उघुरवंशियांसाठी छळछावण्या चालविल्याचे विश्‍वासार्ह पुरावे असल्याचा दावा यात करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या मानवाधिकार आयुक्त व त्यांच्या कार्यालयातील अधिकार्‍यांना झिंजिआंगमध्ये प्रवेश द्यावा, या मागणीचाही पुनरुच्चार करण्यात आला आहे.

संयुक्त राष्ट्रसंघटनेतील या घटनेने चीन अस्वस्थ झाला असून त्याने क्युबासह इतर देशांचे सहकार्य घेत प्रत्युत्तर देणारे निवेदन जारी केले. यात झिंजिआंगचा मुद्दा चीनचा अंतर्गत मुद्दा असल्याचा दावा करण्यात आला. त्याचवेळी चीनवर करण्यात येणारे आरोप राजकीय उद्दिष्टांनी प्रेरित असल्याचेही सांगण्यात आले. संयुक्त राष्ट्रसंघटनेतील चीनचे राजदूत झँग जून यांनीही नाराजी व्यक्त केली असून, आरोप तथ्यहीन असून त्यामागे चीनला धक्का देण्याचे कारस्थान असल्याचा प्रत्यारोप केला आहे.

गेल्या काही वर्षात जगातील अधिकाधिक देश चीनकडून झिंजिआंगमध्ये सुरू असलेल्या कारवायांविरोधात उघड आवाज उठवित आहेत. अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा यासारख्या देशांनी चीनच्या कम्युनिस्ट राजवटीकडून उघुरांवर चाललेले अत्याचार म्हणजे वंशसंहार असल्याचा ठपका ठेवला. इतर देशांमध्येही या स्वरुपाचे प्रयत्न सुरू असून चीनची राजवट चांगलीच अडचणीत आली आहे.

leave a reply