जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता माजविणार्‍यांना सोडणार नाही

- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा इशारा

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या टार्गेट किलिंगच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी तीन दिवसांच्या दौर्‍यावर पोहोचले. यावेळी जम्मू-काश्मीरमधील तरुणांशी संवाद साधताना जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता माजविण्याचा प्रयत्न करणार्‍या दहशतवाद्यांना आणि त्यांना पाठबळ पुरविणार्‍यांना सज्जड इशारा दिला. जम्मू-काश्मीरमध्ये विकासाचे व बदलाचे वारे कोणी थांबवू शकत नाही. येथील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणार्‍यांना सोडण्यात येणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी बजावले. तसेच काश्मीरमध्ये परिसिमन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घेण्यात येतील, असे शहा यांनी स्पष्ट केले.

जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता माजविणार्‍यांना सोडणार नाही - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा इशाराजम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा १९९० सालासारखे दहशतीचे व अराजकतेचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना करीत आहेत. गेल्या काही दिवसात येथे काश्मीरी पंडित व इतर अल्पसंख्यांक, राजकीय कार्यकर्ते, स्थलांतरीत मजूर, पोलिसांवर हल्ले झाले होते. या महिन्यात या घटनांमध्ये अचानक वाढ झाल्याचे पहायला मिळाली. त्याचवेळी जम्मू-काश्मीरमध्ये दोन दशकातील सर्वात मोठे ऑपरेशन पुंछमध्ये सुरू आहे. या ऑपरेशनचा शनिवारी १३ वा दिवस होता. या भागात दहशतवाद्यांबरोबर जोरदार चकमक सुरू असून शनिवारी आणख़ी एक आयईडी शोध मोहिमेदरम्यान जप्त करण्यात आला. या ऑपरेशनदरम्यान आतापर्यंत ९ जवान शहीद झाले आहेत.

या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा जम्मू-काश्मीर दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. दोन वर्षाने जम्मू-काश्मीर भेटीवर आलेल्या केंद्रीय गृहमंत्र्यांनी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जम्मू-काश्मीरचे पोलीस निरिक्षक परवेझ अहमद दार यांच्या कुटुंबियांची भेट घेतली व सांत्वन केले. तसेच त्यांच्या पत्नीला सरकारी नोकरीही देण्यात आली. जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाला उखडून टाकून येथे शांत स्थिरस्थावर करण्यासाठी प्रयत्न व यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावणार्‍या जम्मू-काश्मीर पोलिसांची शहा यांनी प्रशंसा केली.

जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता माजविणार्‍यांना सोडणार नाही - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा इशारायानंतर केंद्रीय गृहमंत्र्यांनी जम्मू-काश्मीर यूथ क्लबच्या सदस्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना निर्वाणीचा इशारा दिला. जम्मू-काश्मीरमधील शांतता भंग करण्याचे कोणतेही प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत आणि तसे करणार्‍यांना सोडण्यात येणार नाही, अशा स्पष्ट शब्दात केंद्रीय गृहमंत्र्यांनी फुटिरांना व दहशतवाद्यांना बजावले. त्याचवेळी जम्मू-काश्मीरच्या विकासात युवकांनी जास्तीत जास्त वाटा उचलावा, असे आवाहन केले. गेल्या दोन वर्षात जम्मू-काश्मीरध्ये दगडफेकीच्या घटना थांबल्या आहेत हे अधोरेखित करताना येथील युवकांना आपले भविष्य उज्वल करण्याची संधी असल्याचे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. जम्मू-काश्मीरमधील ७० टक्के लोकसंख्या ३५च्या वयोगटातील आहे. या तरुणवर्गाला विकासाच्या कामांशी जोडण्यात आले, तर जम्मू-काश्मीर आणखी वेगाने विकास करील असा विश्‍वास शहा यांनी व्यक्त केला.

तसेच येथील राजकीय प्रक्रियेत तरुणांना संधी उपलब्ध व्हावी यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये परिसिमन करण्यात येत आहे. ही परिसिमन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका होतील व त्यानंतर राज्याला पूर्ण राज्याचा दर्जाही बहाल केला जाईल, अशी ग्वाही यावेळी केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिली.

दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या कारागृहात बंद ३८ दहशतवाद्यांना शनिवारी आग्रा येथील मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले. यावेळी कडक बंदोबस्त होता. यातील २७ दहशतवादी हे काश्मीर कारागृहातून आणि ११ दहशतवादी हे जम्मू कारागृहातून हलविण्यात आले.

leave a reply