इस्रायल-अरब देशांमधील अब्राहम कराराची उपेक्षा करू नका

- बायडेन प्रशासनाला माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या सल्लागारांचा इशारा

अब्राहमवॉशिंग्टन – ‘इस्रायल आणि अरब देशांना एकत्र आणण्यासाठी वर्षभरापूर्वी पार पडलेल्या अब्राहम कराराची उपेक्षा करू नका. या सहकार्याला योग्य प्रोत्साहन दिले नाही, तर ते अमेरिकेच्याच अंगलट येईल’, असा इशारा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे सल्लागार जॅरेड कश्‍नर यांनी दिला. बायडेन प्रशासन अब्राहम कराराबाबत सक्रीय नसल्याची टीका कश्‍नर यांनी केली. त्याचबरोबर पॅलेस्टाईनच्या नेतृत्वाने देखील या कराराचा फायदा करून घ्यावा, असे कश्‍नर यांनी सुचविले आहे.

अमेरिकेच्या मध्यस्थीने इस्रायल आणि युएई व बाहरिन यांच्यात झालेल्या ऐतिहासिक अब्राहम कराराला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने वॉशिंग्टनमध्ये आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे सल्लागार जॅरेड कश्‍नर यांनी सदर कराराचे महत्त्व अधोरेखित केले व बायडेन प्रशासनाला बजावले. ‘इस्रायल आणि अरब देशांमधील संबंध सुरळीत करणार्‍या या कराराचे योग्य संगोपन केले नाही, त्याला प्रोत्साहित केले नाही तर हे सहकार्य मोडीत निघेल व ही बाब अमेरिकेवर उलटेल. मात्र या कराराला पाठिंबा दिला तर यातून मिळणारे फायदे प्रचंड आणि आपल्या अपेक्षेच्याही पलिकडे जाणारे असतील’, असे कश्‍नर यांनी स्पष्ट केले.

राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अमेरिकेची सूत्रे हातात घेतल्यानंतर अब्राहम कराराच्या बाजूने काही विधाने केली होती. पण प्रत्यक्षात राष्ट्राध्यक्ष बायडेन व त्यांचे प्रशासन इस्रायल आणि अरब देशांमधील या सहकार्यासाठी उत्सुक नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. या सहकार्यासाठी विशेषदूत नेमण्याचेही बायडेन प्रशासनाने टाळले आहे. दोन दिवसांपूर्वी या कराराच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बायडेन प्रशासनाने परराष्ट्र मंत्रालयाच्या उपसचिव येल लेम्पर्ट यांना रवाना केले होते. इतर अरब देशांना या करारात सहभागी करण्यासाठी बायडेन प्रशासन प्रयत्न करीत नसल्याची टीका होत आहे. या पार्श्‍वभूमीवर कश्‍नर यांनी दिलेला इशारा लक्षवेधी ठरतो.

दरम्यान, इस्रायल आणि अरब देशांमधील या सहकार्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागल्याचे सांगून, अब्राहम करारात सहभागी असलेल्या देशांच्या राजदूतांनी वॉशिंग्टन येथे आयोजित कार्यक्रमात त्यावर समाधान व्यक्त केले.. पुढील दशकभरात युएई व इस्रायलमधील व्यापार एक ट्रिलियन डॉलर्सवर नेण्याचे उद्दिष्ट समोर असल्याचे अमेरिकेतील युएईच्या राजदूत युसेफ अल-ओतैबा म्हणाल्या. तर या सहकार्यामुळे बाहरिनच्या नागरिकांना जेरूसलेममधील अल-अक्सा प्रार्थनास्थळाला भेट देणे शक्य झाले व बाहरिनी जनतेचा इस्रायलकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलल्याचे बाहरिनचे राजदूत शेख अब्दुल्ला बिन राशिद अल-खलिफा यांनी म्हटले आहे. अब्राहम करारामुळे इराणच्या आण्विक धोक्याविरोधात इस्रायल व अरब देशांमध्ये सहकार्य प्रस्थापित करण्याची संधी उपलब्ध झाल्याचे इस्रायलचे राजदूत गिलाड एर्डान यांनी सांगितले.

leave a reply