पाकिस्तानच्या सीमेजवळील लश्कर-ए-तोयबाच्या तळावर अफगाणी लष्कराची कारवाई

काबूल – अफगाणी लष्कराने पाकिस्तानच्या सीमेजवळील ‘लश्कर-ए-तोयबा’चा तळ हल्ले चढवून उद्ध्वस्त केला. या कारवाईत ‘लश्कर’चा कमांडर ठार झाला असून या दहशतवादी संघटनेची मोठी हानी झाल्याचा दावा केला जातो. आपल्या या कारवाईनंतर लश्कर’च्या दहशतवाद्यांनी या हल्ल्यात ठार झालेल्या कमांडरचा मृतदेह घेऊन पाकिस्तानात पलायन केल्याची माहिती अफगाणी लष्कराने दिली. दरम्यान, मुंबईवर २६/११ चा हल्ला घडविणाऱ्या ‘लश्कर’ने पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेजवळ तळ ठोकल्याचा आरोप अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रसंघाने काही दिवसांपूर्वीच केला होता.

Pakistan-Borderअफगाणिस्तानच्या नांनगरहार प्रांतातील स्पिंजरा भागात लश्करने तळ ठोकला होता. पाकिस्तानबरोबरच्या ड्युरांड लाईन सीमेवरील या तळामध्ये लश्कर’च्या दहशतवाद्यांबरोबरच अल कायदा आणि तालिबानचे दहशतवादी असल्याची माहिती अफगाणी लष्कराला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर अफगाणी लष्कराने सोमवारी रात्री केलेल्या कारवाईत लश्करचा बडा कमांडर ठार झाल्याचे अफगाणी सुरक्षा यंत्रणांनी जाहीर केले. याव्यतिरिक्त लश्करचे दहशतवादी मोठ्या संख्येने मारले गेल्याचा दावा अफगाणी सुरक्षायंत्रणा करीत आहेत. पण हे मृतदेह व जखमी दहशतवादी अफगाणी सैन्याच्या हाती पडू नये, यासाठी दहशतवाद्यांनी साथीदारांचे मृतदेह आणि त्याचबरोबर जखमी दहशतवाद्यांसह पाकिस्तानात धुम ठोकली.

गेल्या महिन्याभरात अफगाणी सुरक्षा यंत्रणेने पाकिस्तानच्या सीमेजवळील दहशतवादी तळांवर केलेली ही दुसरी कारवाई ठरते. याआधी पाकतिया प्रांतातील ‘लश्कर’च्या तळावर अफगाणी सुरक्षा यंत्रणेने कारवाई केली होती. अफगाण-पाकिस्तान सीमेवरील दहशतवाद्यांच्या तळांची संख्या वाढू लागल्याची चिंता अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रसंघाने व्यक्त केली आहे. अफगाणिस्तानच्या सीमाभागात किमान साडेसहा हजार पाकिस्तानी दहशतवादी असल्याचे राष्ट्रसंघाने आपल्या अहवालात म्हटले होते. यापैकी हजार दहशतवादी लश्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि तालिबानच्या हक्कानी नेटवर्क या पाकिस्तानी दहशतवादी संघटनांचे असल्याची माहिती राष्ट्रसंघाने दिली होती. लश्कर आणि जैशची तालिबानबरोबरची ही मैत्री फारच चिंताजनक असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाने एका अहवालद्वारे दिला होता.

leave a reply