अफगाणिस्तानचे लष्कर तालिबानला चिरडण्यासाठी सज्ज

- अफगाणी लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्‍याचा विश्‍वास

काबुल – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी जाहीर केल्याप्रमाणे अमेरिकी लष्कराची अफगाणिस्तानातील माघार सुरू झाली आहे. यावर जगभरातून चिंता व्यक्त केली जात असून येत्या काळात तालिबान अफगाणिस्तानवर पुन्हा पकड मिळवेल, असा दावा केला जातो. यावर अफगाणिस्तानच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍याने प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेची सैन्यमाघार पूर्ण झाल्यानंतर, तालिबानला चिरडण्यासाठी आपले स्पेशल फोर्सेसचे जवान सज्ज असल्याचा विश्‍वास या अधिकार्‍याने व्यक्त केला. दरम्यान, गेल्या ३६ तासात अफगाणी लष्कराने १३१ तालिबानी दहशतवाद्यांना ठार केले आहे. तर तालिबानने अफगाणिस्तानातील काही नेत्यांना थेट चर्चेसाठी पत्र पाठविल्याची माहितीही समोर येत आहे.

अमेरिका आणि नाटोच्या लष्करी माघारीवर जगभरातून चिंता व्यक्त केली जात असताना, अफगाण लष्कराच्या ‘स्पेशल ऑपरेशन्स कमांड’चे प्रमुख जनरल हैबतुल्ला अलीझाई यांनी अफगाणी जवानांवर विश्‍वास ठेवा, असे म्हटले आहे. अमेेरिका आणि नाटोच्या जवानांनी अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर स्पेशल ऑपरेशन्सचे जवान तालिबानचे प्रत्येक हल्ले उधळून लावतील, असा दावा जनरल अलीझाई यांनी केला. तसेच आपल्या जवानांसमोर तालिबान जिंकू शकत नसल्याचे जनरल अलीझाई म्हणाले.

‘आजही तालिबानविरोधी मोहिमांमध्ये आपल्या जवानांचा ९५ टक्के सहभाग असतो. यामध्ये परदेशी जवानांना फारशी भूमिका नसते. तालिबानविरोधी कारवाईची योजना आखण्यापासून ती अमलात आणण्यापर्यंत आमचे जवान काम करतात’, असे जनरल अलीझाई यांनी स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. ‘तालिबानने लहान मुलांचा ढालीसारखा वापर करणे, महिलांचा बुरखा परिधान करणे आणि नागरी वस्त्यांमध्ये लपून युद्ध करण्याचे सोडून द्यावे. युद्धभूमीत समोरासमोर लढा, मग आम्ही या युद्धाचा निकाल लावू’, असे आव्हान जनरल अलीझाई यांनी दिले.

गेल्या काही दिवसांपासून अफगाणी लष्कराने तालिबानविरोधी कारवाईची तीव्रता वाढविली आहे. गेल्या ३६ तासात अफगाणी लष्कराने लघमान, गझनी, कंदहार, झाबूल, हेरात, घोर, बल्ख, हेल्मंड, तखार आणि पाकतिका प्रांतात कारवाई केली. यामध्ये १३१ तालिबानी ठार झाले असून यात चार पाकिस्तानींचाही समावेश असल्याची माहिती अफगाणी संरक्षण मंत्रालयाने दिली. या हल्ल्यात ३० तालिबानी जखमी झाले असून चार जणांना ताब्यात घेतल्याचे अफगाणी संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले.

अफगाणी लष्कराच्या या कारवाईसमोर काही ठिकाणी तालिबानच्या दहशतवाद्यांनी शरणांगती पत्करल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. तर काही ठिकाणी तालिबानी अफगाणी सरकारमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप होत आहे. अफगाणिस्तानी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, देशाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अब्दुल्ला अब्दुल्ला, माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई आणि इतर काही नेत्यांना तालिबानने पत्र पाठविले आहे.

या पत्राद्वारे तालिबान अफगाणी नेत्यांशी स्वतंत्ररित्या चर्चा करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा अफगाणी नेते करीत आहेत. पण तालिबान आपल्यात व अफगाण सरकारने चर्चेसाठी नेमलेल्या यंत्रणेमध्ये दुफळी माजविण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप अफगाणी नेते करीत आहेत.

leave a reply