अफगाणी सरकारकडून दोन हजार तालिबानी कैद्यांच्या सुटकेचे आदेश

काबूल – तालिबानने अफगाणी सरकारबरोबर तीन दिवसांच्या संघर्षबंदीची घोषणा केल्यानंतर, अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी दोन हजार तालिबानी कैद्यांची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे अफगाणिस्तानचे सरकार व तालिबानमध्ये चर्चेसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. तालिबानने जाहीर केलेल्या संर्घषबंदीचा पहिला दिवस शांततेत गेल्याने अफगाणिस्तानची जनताही त्यावर समाधान व्यक्त करीत आहे.

२९ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि तालिबानमध्ये शांतीकरार पार पडला. या करारात अफगाणिस्तानातील पाच हजार तालिबानी कैदी सोडण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार अफगाणिस्तानच्या सरकारने टप्प्याटप्प्याने तालिबानी कैद्यांना सोडण्याचे मान्य केले होते. यातील काही कैद्यांची सुटका देखील झाली होती. पण तालिबानचे अफगाणिस्तानातील हल्ले वाढल्यानंतर राष्ट्राध्यक्ष गनी यांनी तालिबानींची सुटका करण्यास नकार दिला होता.

रमझानच्या काळात तालिबानने तीन दिवसांच्या संर्घषबंदीची घोषणा केली. त्यानंतर अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी सदिच्छा पदर्शित करुन दोन हजार तालिबानी कैद्यांना सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच अफगाणिस्तानचे सरकार तालिबानसोबत चर्चा करायला तयार असल्याचा संदेश देखील राष्ट्राध्यक्ष गनी यांनी दिला आहे. यावर तालिबानची काही प्रतिक्रिया आलेली नाही.

दरम्यान, तालिबानच्या या संघर्षबंदीचे भारताने स्वागत केले आहे. या संर्घषबंदीचा कालावधी वाढवावा, असे आवाहनही भारताने केले होते. तसेच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी देखील तालिबानच्या या संर्घषबंदीचे स्वागत केले आहे. ही तात्पुरती संघर्षबंदी म्हणजे अफगाण सरकार आणि तालिबानसाठी संधी ठरते. त्याचा लाभ घेऊन अफगाणिस्तानच्या शांततेसाठी प्रयत्न हवेत, अशी मागणी पॉम्पिओ यांनी यावेळी केली.

leave a reply