अफगाणी जनतेची पाकिस्तानविरोधात तीव्र निदर्शने

- शेकडो अफगाणींकडून पाकिस्तानच्या विनाशाच्या घोषणा

काबुल/पेशावर – ‘पाकिस्तानचा अफगाणिस्तानातील हस्तक्षेप खपवून घेणार नाही’, पाकिस्तानच्या आयएसआयने इथून चालते व्हावे, ‘पाकिस्तानचा विनाश होवो’, ‘पाकिस्तान से आझादी’, अशा घोषणा अफगाणी निदर्शकांनी मंगळवारी अफगाणिस्तानच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये दिल्या. तसेच ‘अफगाणिस्तानात पाकिस्तानच्या इशार्‍यावर नाचणारे सरकार नको, सर्वसमावेशक सरकार हवे’, अशी जोरदार मागणी या निदर्शकांनी यावेळी केली. पाकिस्तानच्या ‘आयएसआय’चे प्रमुख फैझ हमीद यांच्या अफगाणिस्तानातील दौर्‍याच्या विरोधात अफगाणी नागरिकांनी शेकडोंच्या संख्येने ही निदर्शने केली. फैझ हमीद अफगाणिस्तानच्या सरकार स्थापनेत हस्तक्षेप केल्याचा आरोप होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये महिलांकडून निदर्शने सुरू होती. तालिबानच्या नव्या सरकारमध्ये महिला तसेच इतर अल्पसंख्यांकांनाही स्थान मिळावे, यासाठी या महिलांनी राष्ट्राध्यक्षीय निवासस्थानासमोर निदर्शने सुरू केली होती. पहिल्या दोन दिवसात तालिबानच्या दहशतवाद्यांनी या निदर्शकांवर अश्रुधूराचा वापर केला तसेच त्यांना मारहाण केली होती. याचे व्हिडिओ व फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले होते.

पण गेल्या दोन दिवसांपासून काबुलसह, हेरात, बलख येथे या निदर्शनांची तीव्रता वाढली आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख फैझ हमीद यांची अफगाणिस्तानातील उपस्थिती तसेच तालिबानच्या सरकारमध्ये हस्तक्षेप करून हक्कानी गटाचा प्रभाव वाढविण्यासाठी हमीद यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांच्या विरोधात ही निदर्शने भडकल्याचा दावा केला जातो.

त्याचबरोबर, पंजशीरमधील संघर्षात पाकिस्तानच्या हवाईदलाने ड्रोनचे हल्ले चढविल्याचा आरोप नॉर्दन अलायन्सचा प्रमुख अहमस मसूद यांनी केला. तसेच तालिबान आणि पाकिस्तानच्या या हस्तक्षेपाविरोधात अफगाणी जनतेने रस्त्यावर उतरून निदर्शने करावी, असे आवाहन मसूद यांनी सोमवारी रात्री केले.

त्यानंतर मंगळवारपर्यंत पंजशीर, काबुल, हेरात व बलख येथील शहरांमध्ये अफगाणी जनतेने शेकडोंच्या संख्येने एकत्र येऊन पाकिस्तानविरोधात निदर्शने केली. यामध्ये अफगाणी पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याचे व्हिडिओ प्रसिद्ध झाले. काबुलमधील पाकिस्तानच्या दूतावासासमोर निदर्शने करणार्‍या अफगाणी जनतेने पाकिस्तानी अधिकारी व कर्मचार्‍यांच्या हकालपट्टीची मागणी केली. तसेच ‘पाकिस्तानवर निर्बंध टाका’, अशा घोषणा दिल्या.

निदर्शकांना पांगविण्यासाठी तालिबानच्या दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार केला. तर एका दहशतवाद्याने निदर्शक महिलेवर रायफल ताणल्याचा फोटोग्राफ प्रसिद्ध झाला आहे. तर काही निदर्शकांना बँकेच्या इमारतीत डांबल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. इराणमधील पाकिस्तानच्या दूतावासासमोरही निदर्शने झाल्याच्या बातम्या आल्या होत्या.

leave a reply