अफगाणी सुरक्षादलाच्या कारवाईत तालिबानचे २७ दहशतवादी ठार

कंदहार – अफगाणिस्तानातील पाच लष्करी तळांवरून अमेरिकेच्या सैन्य माघारीला २४ तास उलटत नाही तोच अफगाणिस्तानच्या कंदहार प्रांतातील कलांकेचा, मोशान आणि मायवंद भागातील लष्करी चौक्यांवर तालिबानने हल्ला चढविला. मात्र अफगाणिस्तानच्या सुरक्षादलाने तालिबानचा हा डाव उधळून लावत २७ दहशतवाद्यांना ठार केले. या चकमकीत तालिबानचे १६ जण जखमी झाल्याची माहिती अफगाण नॅशनल आर्मीच्या (एएनए) 20 ‘अटल’ कॉर्प्सनी दिली.

Afghani-Security-Forcesबुधवारी रात्रीच्या सुमारास कंदहार प्रांतातील कलांकेचा, मायवांद आणि मोशानमधल्या लष्कराच्या चौक्यांवर हल्ला चढविला. यानंतर अफगाणिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांची या दहशतवाद्यांसोबत चकमक उडाली. या चकमकीत २७ दहशतवादी ठार झाले. या हल्ल्यात अफगाणी सुरक्षा दलाचा एकही जवान ठार झालेला नाही, असे एएनएच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.

अमेरिका व तालिबानमध्ये फेब्रुवारी महिन्यात शांतीकरार झाल्यानंतरही अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या हल्ल्यांचे सत्र सुरु आहे. दोनच दिवसांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये तालिबानने केलेल्या हल्ल्यात ३० जणांचा बळी गेला होता. गेल्या महिन्याभरात तालिबानने अफगाणिस्तानमध्ये चढविलेल्या हल्ल्यात १४६ जणांचा बळी गेला आहे. आता अमेरिकेने अफगाणिस्तानातील पाच लष्करी तळांवरून सैन्य माघारी घेऊनही तालिबानचे हल्ल्यांचे सत्र सुरू असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अफगाणिस्तान सरकार आणि तालिबानमधील वाटाघाटीही पुढे सरकू शकलेल्या नाहीत.

leave a reply