अफगाणिस्तानचे लष्करप्रमुख भारताच्या भेटीवर येणार

नवी दिल्ली – अफगाणिस्तानचे लष्कर तालिबानबरोबर संघर्ष करीत असतानाच, अफगाणिस्तानच्या लष्करप्रमुखांच्या भारतभेटीबाबत आलेल्या बातमीने जगभरातील निरिक्षकांचे लक्ष वेधून घेतले. 27 जुलै रोजी अफगाणिस्तानचे लष्करप्रमुख जनरल वली मोहम्मद अहमदझई तीन दिवसांच्या दौर्‍यासाठी भारतात दाखल होतील. तालिबानबरोबरील युद्धात अफगाणिस्तानला भारताने लष्करी सहाय्य पुरवावे, अशी मागणी या देशाकडून केली जात आहे. कुठल्याही परिस्थितीत अफगाणिस्तानच्या मागे ठामपणे उभे राहण्याची ग्वाही देणार्‍या भारताने ही मागणी मान्य केल्याचा दावा काही विश्‍लेषकांनी केला आहे.

अफगाणिस्तानचे लष्करप्रमुख भारताच्या भेटीवर येणारआपल्या या दौर्‍यात अफगाणिस्तानचे लष्करप्रमुख जनरल अहमदझई भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल व लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांच्याशी जनरल अहमदझई यांची सखोल चर्चा करतील. तालिबानबरोबर युद्ध सुरू असताना, अफगाणी लष्कराला शस्त्रे व संरक्षणसाहित्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासत आहे. याआधी भारताने अफगाणिस्तानला लष्करी हेलिकॉप्टर्स तसेच इतर साहित्याचा पुरवठा केला होता. पुढच्या काळातही भारत अफगाणिस्तानला शस्त्रास्त्रे तसेच संरक्षणसाहित्याचा पुरवठा करू शकेल, असे संकेत जनरल अहमदझई यांच्या या नियोजित दौर्‍यातून मिळत आहेत.

अमेरिकेने सैन्य माघारी घेऊन अफागाणिस्तानला वार्‍यावर सोडले व त्यामुळे लवकरच हा देश तालिबानच्या तावडीत सापडेल, असे दावे केले जात होते. तालिबानला अफगाणी लष्कराच्या विरोधात फार मोठे यश मिळाल्यानंतर या देशाची सत्ता हाती घेण्यापासून तालिबानला कुणीही रोखू शकत नाही, असे चित्र उभे राहिले होते. पण आता अफगाणी लष्कराचा प्रतिकार सुरू झाला असून हवाई हल्ल्याद्वारे अफगाणी लष्कर शेकडो तालिबानी दहशतवाद्यांना ठार करीत असल्याच्या बातम्या येत आहेत. तालिबानला पराजित करण्याची धमक अफगाणी लष्कराकडे असल्याचा विश्‍वास राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी व्यक्त केला होता. तसेच तालिबानने लढाया जिंकल्या तरी युद्ध अफगाणिस्तानचे लष्करच जिंकेल, असे सांगून राष्ट्राध्यक्ष गनी यांनी अफगाणी जनतेसह सार्‍या जगाला आश्‍वस्त केले होते.

त्या पार्श्‍वभूमीवर, अफगाणिस्तान भारतासारख्या शेजारी देशाकडून मोठ्या प्रमाणात लष्करी तसेच आर्थिक सहकार्याची अपेक्षा करीत असल्याचे दिसते. तालिबानच्या मागे पाकिस्तानने आपली ताकद उभी करून तालिबानला सहाय्य करण्यासाठी दहा हजार दहशतवादी अफगाणिस्तानात घुसविले आहेत. तसेच अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमा ताब्यात घेण्यासाठी अफगाणी लष्कराने प्रयत्न केला, तर हवाई हल्ले चढविण्याची धमकी पाकिस्तानने दिली होती. अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात गेला, तर हा देश दहशतवादाचे आगर बनेल व पाकिस्तानला तेच अपेक्षित असल्याचे अफगाणिस्तानचे नेते बजावत आहेत. अशा परिस्थितीत भारताने अफगाणिस्तानला सहाय्य करणे अत्यावश्यक बनल्याचे अफगाणी नेत्यांचे म्हणणे आहे.

अफगाणिस्तानचे लष्करप्रमुख भारताच्या भेटीवर येणारदरम्यान, भारताने देखील लष्करी सहाय्याच्या आघाडीवर अफगाणिस्तानला आश्‍वस्त केल्याच्या बातम्या येत आहेत. अफगाणिस्तानातील युद्धात भारताने तटस्थ रहावे आणि काबुलमधील सरकारला सहाय्य करू नये, अशी मागणी तालिबानने केली होती. मात्र तालिबान पाकिस्तानच्या नियंत्रणात राहणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, भारताने अधिक उघडपणे अफगाणिस्तानला सहाय्य करण्याचा निर्णय घेतल्याचे दावे सामरिक विश्‍लेषकांनी केले आहेत. तसेच भारताच्या या निर्णयाचे परिणाम लवकरच अफगाणिस्तानात दिसतील, असे या सामरिक विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

अफगाणिस्तानात भारताने सुमारे तीन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. तालिबानमुळे ही गुंतवणूक धोक्यात आल्याचा दावा करून पाकिस्तानचे मंत्री त्यावर समाधान व्यक्त करीत होते. मात्र भारत अफगाणिस्तानच्या लष्कराला सहाय्य करणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्यानंतर पाकिस्तानच्या चिंतेत वाढ झाल्याचे स्पष्टपणे दिसू लागले होते. पुढच्या काळात भारताच्या सहाय्यमुळे प्रबळ झालेल्या अफगाणी लष्कराकडून तालिबानला आव्हान मिळू शकते व तसे झाल्यास त्याचे फार मोठे दडपण पाकिस्तानवर येईल, अशी भीती पाकिस्तानच्या निरिक्षकांना वाटू लागली आहे.

leave a reply