पाकिस्तानला हवेच असेल तर अफगाणिस्तान युद्धासाठी तयार आहे

- अफगाणिस्तानच्या सुरक्षा यंत्रणेचा इशारा

काबुल – ‘अफगाणिस्तानात शांती प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानने प्रामाणिक प्रयत्न केले तर यामुळे अफगाणिस्तानसह पाकिस्तानचाही विकास होईल. पण तालिबानला हाताशी घेऊन पाकिस्तानने युद्धाची तयारी केलीच असेल, तर अफगाणिस्तान देखील या युद्धासाठी तयार आहे’, असा खणखणीत इशारा अफगाणिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेचे उपप्रमुख नझर अली वाहिदी यांनी केला. या युद्धाच्या तयारीसाठी पाकिस्तानने तालिबानच्या नेत्यांची पेशावरमध्ये बैठक बोलाविली आहे, असा आरोप वाहिदी यांनी केला.

ताजिकिस्तानमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ‘हार्ट ऑफ एशिया’च्या बैठकीत अफगाणिस्तानच्या स्थैर्यासाठी आपला देश प्रयत्न करीत असल्याची दिखाऊ भूमिका स्वीकारणार्‍या पाकिस्तानचे खरे इरादे उघड होऊ लागले आहेत. पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’ने तालिबानचे नेते व कमांडर्सना एकत्र बोलावले आहे. आयएसआय पेशावरमध्ये तालिबानच्या या नेत्यांची बैठक घेणार आहे. पुढच्या दोन महिन्यात तालिबानने अफगाणिस्तानात युद्ध छेडावे, अशी सूचना आयएसआय तालिबानच्या दहशतवाद्यांना करणार आहे.

अफगाणिस्तानची गुप्तचर यंत्रणा ‘नॅशनल डायरेक्टोरेट ऑफ सिक्युरिटी’चे (एनडीएस) उपप्रमुख नझर अली वाहिदी यांनी माध्यामांशी बोलताना हा गौप्यस्फोट केला. ‘अफगाणिस्तानात शांती प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानने प्रामाणिक प्रयत्न केला तर याचा फायदा पाकिस्तानच्या विकासासाठी देखील होऊ शकतो. पण अफगाणींना ठार कसे करायचे याचाच विचार पाकिस्तान कायम करीत असतो. त्यामुळे पाकिस्तानने तालिबानला हाताशी घेऊन युद्धाची तयारी केलीच असेल तर अफगाणी लष्करही या युद्धासाठी तयार आहे’, असा सज्जड इशारा वाहिदी यांनी दिला.

वाहिदी यांच्याप्रमाणे अफगाणिस्तानच्या संरक्षण तसेच अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने देखील तालिबानच्या मोठ्या हल्ल्यांची शक्यता वर्तविली आहे. प्रमुख ठिकाणांना लक्ष्य करून अफगाणिस्तानात राजकीय आघाडी मिळविण्याची योजना शत्रूने आखल्याचा आरोप अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाचे उपप्रमुख मोहम्मद अन्वर बरीपाल यांनी केला. तर अफगाणिस्तानच्या दक्षिण, पश्‍चिम तसेच काही प्रमुख प्रांतांच्या सुरक्षेला धोका असल्याची माहिती या देशाचे उपसंरक्षणमंत्री इक्बाल अली नादेरी यांनी दिली.

गेल्या काही आठवड्यांपासून तालिबानने अफगाणिस्तानातील हल्ल्यांची तीव्रता वाढविली आहे. अफगाणी सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार व मंगळवारच्या दरम्यान अफगाणिस्तानच्या २० प्रांतांमध्ये तालिबानने सुरक्षा यंत्रणांवर हल्ले चढविले होते. या हल्ल्यांमध्ये अफगाणी लष्कराची जीवितहानी झाल्याचा दावा केला जातो. तर कंदहार, हेल्मंड, गझ्नी, मैदान, वारदाक, बडाखशान, बल्ख, लाघमान या प्रांतात केलेल्या कारवाईत ७४ तालिबानींना ठार केल्याचे अफगाणी सुरक्षा यंत्रणांनी म्हटले आहे.

दरम्यान, पाकिस्तानचे लष्कर आणि गुप्तचर यंत्रणा आयएसआय तालिबानचा वापर करून आपल्या देशात अस्थैर्य निर्माण करीत असल्याचा आरोप अफगाणिस्तान करीत आहे. काही आठवड्यांपूर्वीच तालिबानच्या वरिष्ठ नेत्यांनी पाकिस्तानमध्ये येऊन पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेतल्याचे उघड झाले होते. त्यामुळे अफगाणिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेच्या उपप्रमुखांनी केलेल्या आरोपांचे महत्त्व वाढले आहे.

leave a reply