अफगाणिस्तानचा भारताविरोधात वापर होऊ देणार नाही

- तालिबानच्या प्रवक्त्याची ग्वाही

भारताविरोधात वापरनवी दिल्ली – तालिबानची सत्ता आल्यास अफगाणिस्तानच्या भूमीचा भारताच्या विरोधात वापर होऊ देणार नाही, अशी ग्वाही तालिबानच्या प्रवक्त्याने दिली आहे. इतकेच नाही तर अफगाणिस्तानसाठी भारताच्या सहकार्याचे आम्ही स्वागतच करू, असे या प्रवक्त्याने म्हटले आहे. सध्या अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर अफगााणिस्तानात काय होईल, यावर जोरदार चर्चा सुरू आहे. तालिबानने दिलेल्या मुदतीनंतरही अफगाणिस्तानात अमेरिकेचे सैन्य तैनात राहणार असल्याची घोषणा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेली आहे. यामुळे अफगाणिस्तानात घनघोर संघर्ष पेट घेईल, अशी चिंता व्यक्त केली जात असताना, तालिबानने भारताला आश्‍वस्त केल्याचे दिसत आहे.

अमेरिकेच्या नॅशनल इंटेजिलन्स कौन्सिलने अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर या देशात संघर्ष पेट घेईल असा इशारा दिला होता. याचा फायदा घेऊन अफगाणिस्तानात दहशतवादी संघटना थैमान घातली व या संघटनात भारतात घातपात माजवू शकतात. यानंतर भारत पाकिस्तानवर हल्ला चढविल आणि दोन्ही देशांना अपेक्षित नसलेले दिर्घकाळ चालणार्‍या युद्धाचा भडका उडेल, असे अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्स कौन्सिलच्या अहवालात बजावण्यात आले आहे. हा अहवाल प्रसिद्ध होऊन काही दिवस उलटण्याच्या आत तालिबानच्या प्रवक्त्याने भारताला आश्‍वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

एका पाश्‍चिमात्य वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तालिबानचा प्रवक्ता डॉ. मुहम्मद नईम वरदाक याने अफगाणिस्तानची भूमी भारताच्या विरोधात वापरू दिली जाणार नाही, अशी ग्वाही दिली. तसेच अफगाणिस्तानसाठी भारत करीत असलेल्या सहकार्याचे तालिबान स्वागत करील, आम्हाला सर्वच शेजारी देशांबरोबर सहकार्य अपेक्षित आहे, असे वरदाक यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी तालिबान पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संघटना ‘आयएसआय’ व पाकिस्तानी लष्कराच्या इशार्‍याने काम करीत नाही, असा अत्यंत महत्त्वपूर्ण दावा डॉ. वरदाक यांनी केला.

तालिबानमध्ये असलेल्या हक्कानी नेटवर्क या गटाचा पाकिस्तानची आयएसआय भारताच्या विरोधात वापर करीत आली आहे. पण तालिबानमध्ये असा गट सक्रीय नसल्याचे डॉ. वरदाक यांनी म्हटले आहे. याआधीही तालिबानने आपल्याला भारताशी सहकार्य अपेक्षित असल्याचा दावा केला होता. पाकिस्तानातील काही भारतद्वेष्टे विश्‍लेषक तालिबान भारताबाबत सहानुभूतीचे धोरण स्वीकारीत असल्याची सडकून टीका केली होती. तसे करून तालिबानने पाकिस्तानचा विश्‍वासघात केल्याचे या पाकिस्तानी विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, भारत अजूनही तालिबानकडे संशयाने पाहत असून अमेरिकेने अफगाणिस्तानातून घाईघाईने माघार?घेऊ नये, अशीच भारताची भूमिका आहे. पण पुढच्या काळात अफगाणिस्तानची सत्ता तालिबानच्या हाती पडली, तरी त्यांना ९०च्या दशकासारखी टोकाची भूमिका घेता येणार नाही, अफगाणी जनतेच्या आकांक्षा बदललेेल्या आहेत, याची जाणीव तालिबानला झालेली आहे, याकडे काही विश्‍लेषक लक्ष वेधत आहेत. म्हणूनच अफगाणिस्तानच्या निर्मितीसाठी तालिबानला भारताचे सहाय्य घ्यावेच लागेल, असे सांगून हे विश्‍लेषक भारताने तालिबानशी चर्चा करण्यास हरकत नसल्याचा सल्ला देत आहेत.

leave a reply