अफगाणींचा अमेरिकी राष्ट्राध्यक्षांवर विश्‍वास उरलेला नाही

- अफगाणिस्तानच्या अमेरिकेतील राजदूत

वॉशिंग्टन – ‘राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी ज्याप्रकारे अफगाणिस्तानातून सैन्यमाघार घेतली, त्यानंतर एकाही अफगाणीचा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर विश्‍वास उरलेला नाही. यापुढे अफगाणी नागरिक कुठल्याही अमेरिकी राष्ट्राध्यक्षांवर भरोसा करणार नाहीत’, अशी जळजळीत टीका अमेरिकेतील अफगाणिस्तानच्या राजदूत अदेला राझ यांनी केली. मात्र अमेरिकी नागरिक आणि लष्कराने अफगाणिस्तानसाठी दिलेल्या बलिदानासाठी अफगाणी जनता तितकीच कृतज्ञ असल्याचे राझ यांनी अमेरिकी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

अफगाणींचा अमेरिकी राष्ट्राध्यक्षांवर विश्‍वास उरलेला नाही - अफगाणिस्तानच्या अमेरिकेतील राजदूतअमेरिका हा अजूनही जागतिक लोकशाहीचे नेतृत्व करणारा देश आहे का? या प्रश्‍नावर राजदूत राझ यांनी टोला हाणला. ‘गेली वीस वर्षे अमेरिकेने अफगाणिस्तानात लोकशाही प्रस्तापित करण्यासाठी प्रयत्न केले. अफगाणी जनतेनेही त्यांच्यावर विश्‍वास ठेवला व त्यासाठी संघर्षही केला. पण अमेरिकेने जेव्हा तालिबानबरोबर वाटाघाटी सुरू केल्या तेव्हा मात्र अफगाणींचा अमेरिकेच्या नेतृत्वावरील विश्‍वास कमी झाला’, अशा शब्दात राजदूत राझ यांनी अमेरिकेने तालिबानबरोबर दोहा येथे केलेल्या करारावर ताशेरे ओढले.

अफगाणींचा अमेरिकी राष्ट्राध्यक्षांवर विश्‍वास उरलेला नाही - अफगाणिस्तानच्या अमेरिकेतील राजदूतत्याचबरोबर अश्रफ गनी यांचे अफगाणिस्तानातील पलायन हे आधीपासूनच ठरले होते, असा आरोप राजदूत राज यांनी केला. तर बायडेन प्रशासनाला अफगाणी मुली व महिलांच्या अधिकारांची पर्वा नसल्याचे त्यांच्या धोरणावरुन स्पष्ट होते, असा आरोप अफगाणी राजदूतांनी केला. यासाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांच्या अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीबाबतच्या विधानांकडे लक्ष वेधले. अमेरिका जगाची सुरक्षा करू शकत नाही, असे सांगून राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी सैन्यमाघारीचे समर्थन केले होते.

दरम्यान, तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेऊन महिना लोटला आहे. पण जगभरातील अफगाणिस्तानचे राजदूत तालिबानचे नेतृत्व स्वीकारायला तयार नाहीत. अफगाणिस्तानवरील तालिबानचा ताबा हा पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे जगभरातील अफगाणी राजदूतांचे म्हणणे आहे. अदेला राझ यांनी देखील तालिबानचे नेतृत्व स्वीकारणार नसल्याचे ठणकावून सांगितले.

leave a reply