संघर्षबंदीनंतरही पाकिस्तानच्या भारतविरोधी कारवाया थांबलेल्या नाहीत

- संरक्षणदलप्रमुख जनरल रावत यांचा इशारा

नवी दिल्ली – ‘काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर संघर्षबंदी लागू झालेली आहे, ही चांगली बाब ठरते. मात्र पाकिस्तान ड्रोन्सद्वारे शस्त्रे आणि अमली पदार्थांची तस्करी करीत आहे. त्यामुळे सीमेवर शांतता ठेवून भारताच्या अंतर्गत भागात अशांतता व अस्थैर्य माजविण्याचे प्रयत्न पाकिस्तानने सोडून दिलेले नाहीत. अशा परिस्थितीत नियंत्रण रेषेवरील संघर्षबंदीला अर्थ उरत नाही’, असे संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी बजावले आहे. हा इशारा देऊन जनरल रावत यांनी सीमेवर शांतता कायम ठेवून भारतात अस्थैर्य माजविण्याच्या पाकिस्तानच्या कट कारस्थानाचा पर्दाफाश केला आहे.

संघर्षबंदीनंतरही पाकिस्तानच्या भारतविरोधी कारवाया थांबलेल्या नाहीत - संरक्षणदलप्रमुख जनरल रावत यांचा इशाराजम्मू व काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर आत्तापर्यंत तरी नव्याने लागू करण्यात आलेली संघर्षबंदी कायम राहिली आहे. ही चांगली बाब ठरते. असे असले तरी शस्त्रे व दारूगोळा ड्रोनद्वारे भारतात पोहोचविला जात आहे. यामध्ये अमली पदार्थांचाही समावेश आहे. हे घडविले जात असेल, तर सीमेवरील संघर्षबंदीला फारसा अर्थ उरत नाही. सीमेवर शांतता प्रस्थापित करून दुसर्‍या देशाच्या भूभागात अस्थैर्य माजविणे असा संघर्षबंदीचा अर्थ होत नाही. म्हणूनच आम्हाला नियंत्रण रेषेबरोबरच जम्मू व काश्मीरमध्ये शांतता अपेक्षित आहे’, असे संरक्षणदलप्रमुखांनी पाकिस्तानला बजावले. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानी ड्रोन्सद्वारे जम्मू व काश्मीर तसेच पंजाबमध्ये शस्त्रास्त्रे व अमली पदार्थांची तस्करी केली जात आहे. सीमा सुरक्षा दलाने असे ड्रोन्स पकडले असून यातील काही ड्रोन्स नष्ट करण्यात आले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर, संरक्षणदलप्रमुख जनरल रावत यांनी पाकिस्तानच्या या कारवायांवर भारताची करडी नजर रोखलेली आहे, याची जाणीव करून दिली.

दरम्यान, भारत काश्मीरमध्ये काहीतरी मोठे घडविण्याच्या तयारीत असल्याची चर्चा पाकिस्तानमध्ये सुरू झाली आहे. भारतीय नेते काश्मीरच्या संदर्भात भेटीगाठी करीत असून याद्वारे फार मोठ्या घडामोडींचे संकेत मिळत असल्याची चिंता पाकिस्तानी विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत. काश्मीरबाबत भारताने घेतलेला निर्णय पाकिस्तान स्वीकारणार नाही, असे या देशाचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी जाहीर केले होते. तर काही पाकिस्तानी पत्रकार पाकिस्तानव्याप्त काश्मीरवर भारतीय लष्कर हल्ला चढविणार असल्याची भीती व्यक्त करीत आहेत. यासाठी भारतीय लष्कराने मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू केल्याचे दावेही पाकिस्तानी माध्यमांमध्ये केले जात आहेत.

सध्या भारत चीनच्या सीमेवर गुंतलेला असल्याचे सांगून अशा स्थितीत भारत पाकिस्तानव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी लष्करी मोहीम छेडणार नाही, असा दावा करणारे काही पाकिस्तानी पत्रकार समोर आले आहेत. पण भारतीय सैन्याने गलवानच्या खोर्‍यात चीनला दिलेल्या दणक्यानंतर, पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत, असे भारताच्या माजी लष्करी अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. चीनच्या लष्कराची भारतीय सैन्य पर्वा करीत नाही, तिथे पाकिस्तानची भारतासमोर काय अवस्था होईल, याची चिंता पाकिस्तानला वाटू लागली आहे. याच कारणामुळे पाकिस्तानी लष्कराला काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर संघर्षबंदीची गरज वाटू लागली होती, असे भारताचे माजी लष्करी अधिकारी सांगत आहेत. संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनीही याबाबत महत्त्वाचे विधान केले. गलवानच्या संघर्षानंतर चीनला आपल्या लष्कराला अधिक प्रशिक्षणाची व तयारीची गरज असल्याची जाणीव झालेली आहे, असे जनरल रावत यांनी म्हटले आहे.

leave a reply