इंजिनिअर्सच्या हत्येनंतर चीनने पाकिस्तानला धारेवर धरले

- पाकिस्तानात जवान व क्षेपणास्त्रांच्या तैनातीचा प्रस्ताव दिला

बीजिंग – पाकिस्तानच्या कोहिस्तानमध्ये झालेल्या घातपातात चीनचे नऊ इंजिनिअर्स ठार झाले होते. याची गंभीर दखल घेऊन चीनने या प्रकरणी पाकिस्तानला धारेवर धरले आहे. चिनी अधिकार्‍यांचे पथक या घातपाताच्या तपासासाठी पाकिस्तानात रवाना करण्यात आले. इतकेच नाही तर चिनी नागरिकांची सुरक्षा करणे पाकिस्तानला जमत नसेल, तर चीन आपल्या ‘स्पेशल फोर्सेस’चे जवान आणि क्षेपणास्त्रे पाकिस्तानात तैनात करील, असा इशारा चीनने दिला आहे.

इंजिनिअर्सच्या हत्येनंतर चीनने पाकिस्तानला धारेवर धरले - पाकिस्तानात जवान व क्षेपणास्त्रांच्या तैनातीचा प्रस्ताव दिलापाकिस्तानच्या कोहिस्तानमधील दासू धरणावर काम करणारे चीनचे इंजिनिअर्स प्रवास करीत असलेल्या बसमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. यात चीनचे हे नऊ इंजिनिअर्स ठार झाले होते. पाकिस्तानने हा घातपात नसल्याचे सांगून ही दुर्घटना असल्याचे दावे केले होते. मात्र कालांतराने हा दहशतवादी हल्ला असल्याचे पाकिस्तानला मान्य करावे लागले. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर जहाल प्रतिक्रिया देऊन पाकिस्तानने चिनी नागरिकांच्या सुरक्षेला अधिक महत्त्व द्यावे, अशी सूचना केली होती.

चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने पाकिस्तानात चिनी इंजिनिअर्सची हत्या ही अतिशय गंभीर बाब असल्याचे सांगून त्यावर चिंता व्यक्त केली. पुढच्या काळात पाकिस्तानला चिनी नागरिकांची सुरक्षा करणे जमत नसेल, तर चीन स्वतःहून ही जबाबदारी स्वीकारू शकेल, अशा शब्दात ग्लोबल टाईम्सच्या लेखात पाकिस्तानला खडसावले आहे.

पाकिस्तानात चीनला संभवणारे धोके चीन पाकिस्तानच्या सहमतीने दूर करू शकतो. त्यासाठी आवश्यक असेल तर ‘स्पेशल फोर्सेस’चे जवान व क्षेपणास्त्रेही चीन तैनात करू शकेल, असा दावा या सरकारी मुखपत्राने केला.

इंजिनिअर्सच्या हत्येनंतर आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी चीनने ‘सीपीईसी’बाबत पाकिस्तानी अधिकार्‍यांबरोबर होणारी बैठक पुढे ढकलली. याचे परिणाम पाकिस्तानला जाणवू लागले आहेत. ज्या दासू धरणावर चीनचे हे इंजिनिअर्स काम करीत होते, तो प्रकल्प सध्या बंद ठेवण्यात आलेला आहे. इतकेच नाही तर या प्रकल्पातून पाकिस्तानी कामगारांची हकालपट्टी करण्याचा निर्णय चीनने घेतला आहे. पुढच्या काळात चीन पाकिस्तानची अधिक मानहानी करणारे निर्णय घेऊ शकेल, असे संकेत मिळत आहेत.

leave a reply