यशस्वी चाचण्यानंतर लडाखमध्ये तैनात करण्यासाठी आणखी ४० ‘वज्र’ तोफा खरेदी करणार

नवी दिल्ली – भारत आणि दक्षिण कोरियाने संयुक्तरित्या विकसित केलेल्या ‘के-९वज्र’ या तोफांच्या लडाखमधील अतिउंचीवरील भागात घेण्यात आलेल्या चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत. या चाचण्यातून येथील दुर्गम क्षेत्रांमध्येही ‘वज्र’ तोफांची उपयुक्तता सिद्ध झाली असून लष्कर लडाखमध्ये तैनात करण्यासाठी आणखी ४० तोफा खरेदी करण्याचा विचार करीत असल्याचे वृत्त आहे.

यशस्वी चाचण्यानंतर लडाखमध्ये तैनात करण्यासाठी आणखी ४० ‘वज्र’ तोफा खरेदी करणारफेब्रुवारी महिन्यात १०० ‘वज्र’ तोफा भारतीय लष्कराच्या स्वाधीन करण्यात आल्या होत्या. २०१७ साली यासाठी भारत आणि दक्षिण कोरियामध्ये करार झाला होता. ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाअंतर्गत या तोफांची निर्मिती भारतात लार्सन ऍण्ड टुब्रोने केली आहे. पहिल्या १०० ‘के-९वज्र टी’ या १५५ एमएम/५२ कॅलिबरच्या सेल्फप्रोपेल्ड तोफा या खासकरून वाळवंटी क्षेत्रात तैनातीसाठी खरेदी करण्यात आल्या होत्या. मात्र चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर या तोफा लडाखमध्येही तैनात करण्यात येणार आहेत. चार महिन्यांपूर्वी लष्कराच्या ताफ्यातील तीन ‘वज्र’ तोफा लडाखमध्ये तैनात करण्यात आल्या. येथील दुर्गम वातावरणात या तोफांची चाचणी घेण्यात आली. या चाचण्या यशस्वी ठरल्याचे वृत्त आहे. त्यानंतर खास लडाखमध्ये तैनात करण्यासाठी लष्कर आणखी ४० तोफा खरेदी करण्याचा विचार करीत आहेत.

leave a reply