डेल्टा प्लस व्हेरियंटच्या पहिल्या बळीनंतर महाराष्ट्रात अनलॉकच्या नियमांमध्ये बदल

मुंबई – महाराष्ट्रात डेल्टा प्लस या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झालेल्या पहिल्या बळीची नोंद झाली आहे. याबाबतचा अहवाल समोर आल्यावर महाराष्ट्र सरकारने अनलॉकच्या नियमात बदल केले आहेत. या आधीच्या नियमावलीनुसार संक्रमणाच्या आणि ऑक्सीजन बेड उपलब्धतेच्या आधारावर जिल्ह्यांची पाच स्तरात विभागणी करण्यात आली होती. यानुसार पहिल्या दोन स्तरात मोडणार्‍या जिल्ह्यांमध्ये निर्बंधांमध्ये मोठी सुट देण्यात आली. मात्र आता पहिला आणि दुसरा स्तर काढून टाकण्यात आला असून सर्व जिल्हे व महानगरपालिका क्षेत्रात तिसर्‍या स्तराप्रमाणेच निर्बंध लागू राहणार आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झालेल्या एका 80 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. या महिलेच्या स्वॅबचे नमुने जिनोम तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल समोर आला असून या महिलेला डेल्टा प्लस या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झाली होती, हे स्पष्ट झाले आहे. यामुळे डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे महाराष्ट्रातील गेलेला पहिला बळी, अशी या महिलेच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातही डेल्टा प्लसची लागण झालेल्या एका रुग्णाचा बळी गेला होता. संगमेश्वरमधील डेल्टा प्लसमुळे बळी गेलेल्या महिलेला इतरही आजार होते, असे सांगितले जात आहे. मात्र यामुळे चिंता नक्कीच वाढल्या आहेत.

देेशभरातून तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 45 हजार नमुने जिनोम सिक्वेन्स तपासण्यासाठी पाठविण्यात आले होते. यातील आतापर्यंत 11 राज्यात 48 जणांना डेल्टा प्लसची लागण झाल्याचे लक्षात आले आहे. यातील सर्वाधिक संख्या महाराष्ट्रातील आहे. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे रत्नागिरीत जिल्ह्यतील असून संगमेश्वर तालुक्यातच यातील बहुतांश रुग्ण आहेत. डेल्टा प्लसचे संक्रमण किती वेगाने पसरत आहे, याची अजून पूर्ण कल्पना आलेली नाही. केंद्र सरकारनेही डेल्टा प्लसचे रुग्ण आढळलेल्या राज्यांना सावधानतेचा इशारा दिला होता. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार अनलॉकच्या नियमात आता बदल करण्यात आले आहेत.

पंधरा दिवसांपूर्वी जारी करण्यात आलेल्या नियमांनुसार राज्यातील जिल्ह्यांमध्ये सुट देताना तेथील संक्रमणाचा दर आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता याचा विचार करण्यात आला होता. यानुसार पाच स्तर बनविण्यात आले होते. 5 टक्क्यांपेक्षा पॉझिटिव्ह दर कमी असलेल्या केवळ 25 टक्के ऑक्सिजन बेड भरलेल्या जिल्ह्यांना पहिल्या स्तरात ठेवण्यात आले होते. पहिल्या स्तरात मोडणार्‍या जिल्ह्यांमध्ये संपूर्ण अनलॉक अर्थात सर्व निर्बंध मागे घेण्याचा निर्णय झाला. यानुसार अशा जिल्ह्यांमधील नियम तेथील जिल्हा प्रशासनाने मागे घेतले होते. तर दुसर्‍या स्तरात 5 टक्क्केपॉझिटिव्ह दर असलेल्या 25 ते 40 टक्के ऑक्सिजन बेड भरलेल्या जिल्ह्यांचा समावेश होता. या स्तरात मोडणार्‍या जिल्ह्यांमध्येही 144 कलमाअंतर्गत जमावबंदी कायम ठेवताना निर्बंधात मोठी सुट देण्यात आली होती.

मात्र आता हे दोन्ही स्तर काढून टाकण्यात आले आहेत. पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजनची उपलब्धता कितीही कमी असली तरी राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसर्‍या स्तराच्या वरच ठेवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. तिसर्‍या स्तरात मोडणार्‍या जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात सुट आहे. तर चौथ्या आणि पाचव्या स्तरावर संक्रमणाचा दर आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता कमी असल्याने तेथे नियम कडक आहेत.

तिसर्‍या स्तरानुसार अत्यावश्यक वस्तूंची दुकाने मेडिकल वगळता आठवड्याचे सर्व दिवस सायंकाळी 4 वाजपर्यंतच खुली राहणार आहेत. तर इतर दुकाने शनिवार-रविवार वगळता सायंकाळी 4 पर्यंत सुरु राहतील. रेस्टॉरंट, व्यायामशाळा, सलूनही 50 टक्के क्षमतेने सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा आहे.

दरम्यान, आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्याचे निर्देश देण्यात आले असून लसीकरणाचा वेग वाढविण्यासही जिल्हा प्रशासनांना सांगण्यात आले आहेत. तसेच कंटेन्मेंट झोन बनविण्याचे आणि टेस्टिंग, ट्रॅकींग आणि ट्रीटमेंट या पद्धतीचा अवलंब करण्याची सूचना करण्यात आली आहेे.

leave a reply