गेल्या वर्षी चीनबरोबर लडाखमध्ये झालेल्या संघर्षानंतर वायुसेनेने युद्धसज्जतेचे प्रदर्शन घडवून अपेक्षित परिणाम साधला

- वायुसेनाप्रमुख व्ही. आर. चौधरी

अपेक्षित परिणामहिंडन – ‘गेल्या वर्षी पूर्व लडाखमध्ये झालेल्या घडामोडीनंतर वायुसेनेने आपली युद्धसज्जता व क्षमता प्रदर्शित केली. वायुसेनेच्या गतीमान व निर्णायक हालचालींचे अपेक्षित परिणाम समोर आले’, अशा नेमक्या शब्दात वायुसेनाप्रमुख व्ही. आर. चौधरी यांनी गेल्या वर्षी चीनबरोबर लडाखमध्ये पार पडलेल्या संघर्षात वायुसेनेने बजावलेल्या भूमिकेची माहिती दिली. गलवानच्या संघर्षानंतर चीनला लडाखच्या एलएसीवरील हवाई क्षेत्रात वायुसेनेने गस्त सुरू करून जबरदस्त सामर्थ्यप्रदर्शन केले होते. त्याचे फार मोठे दडपण चीनवर आले होते. वायुसेनेच्या ८९ व्या स्थापनादिनाचे औचित्य साधून एअरचीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी गेल्या वर्षातील वायुसेनेच्या या कामगिरीची आठवण करून देऊन चीनला संदेश दिला.

हिंडान येथील वायुसेनेच्या तळावर पार पडलेल्या समारोहात वायुसेनाप्रमुख चौधरी बोलत होते. यावेळी संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत व लष्करप्रमुख मनोज मुकूंद नरवणे आणि नौदलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या समारोहात वायुसेनेच्या ताफ्यात फार आधी समाविष्ट असलेल्या डाकोटा व डॉर्निअर विमानांपासून ते आत्ताच्या तेजस व रफायल विमानांचे प्रदर्शन घडविण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ विमानांच्या ताफ्याच्या या प्रदर्शनाची माहिती जाणीवर्पूक उघड करण्यात आली नव्हती, कारण आम्हाला सर्वांना चकीत करायचे होते, अशी माहिती वायुसेनेच्या अधिकार्‍यांनी दिली. ८९ व्या स्थापनादिनाचे औचित्य साधून यावेळी वायुसेनेच्या क्षमतेचे प्रदर्शन घडविण्यात आले. चीन पुन्हा एकदा एलएसीवर कुरापतखोर कारवाया करीत असताना, वायुसेनेच्या या सामर्थ्यप्रदर्शनाचे महत्त्व वाढले आहे.

गेल्या वर्षी लडाखच्या एलएसीवर भारतीय लष्कराचा चीनबरोबर संघर्ष झाला होता. यानंतर वायुसेनेने आपली सुखोई ३० एमकेआय, जॅग्वार व मिराज २००० विमाने या क्षेत्रात तैनात केली होती. लडाखच्या क्षेत्रात तसेच एलएसीवरील इतर क्षेत्रातही भारतीय वायुसेनेची नियमित गस्त सुरू झाली. यावेळी वायुसेनेने एलएसीवर वर्चस्व गाजविले होते. इतकेच नाही तर या क्षेत्रात भारतीय वायुसेनेची क्षमता चीनपेक्षा कितीतरी पटीने अधिक असल्याचा निर्वाळा पाश्‍चिमात्य विश्‍लेषकांनी दिला होता.

गेल्या वर्षातील या घटनांचा दाखला देऊन याद्वारे वायुसेनेने आपले सामर्थ्य व क्षमता यांचा परिचय घडविल्याचे वायुसेनाप्रमुख यावेळी म्हणाले. त्याचवेळी वायुसेना आपल्या क्षमतेमध्ये सातत्याने वाढ करीत असल्याची जाणीवही त्यांनी करून दिली. याबरोबरच वायुसेनेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी आपल्या सहकार्‍यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी अधिक वेळ व प्रयत्न यांची गुंतवणूक करायला हवी. याद्वारे भविष्यातील नेतृत्त्वाची अधिक प्रभावीपणे उभारणी होईल, असा विश्‍वास वायुसेनाप्रमुखांनी व्यक्त केला. याबरोबरच देशी तंत्रज्ञानावर आपला विश्‍वास आहे व त्याच्या अधिक प्रभावी वापरासाठी कौशल्य आणि कल्पकता दाखविण्यासाठी चाकोरीबाहेरच्या संकल्पना वापरण्याची तयारी आपण करायला हवी, असा संदेश वायुसेनाप्रमुखांनी आपल्या सहकार्‍यांना दिला.

यासाठी स्वतंत्र डावपेच आखण्याची कल्पकता आपण दाखवायला हवी व याकरीता नेतृत्त्व विकसित करण्याचे काम वायुसेनेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी करावे, असे आवाहन वायुसेनाप्रमुख चौधरी यांनी केले आहे. दरम्यान, लडाखमध्ये चीनबरोबर झालेल्या संघर्षाच्या काळात वेस्टर्न कमांडची जबाबदारी त्यावेळी एअर मार्शल असलेल्या व्ही. आर. चौधरी यांच्यावरच होती. त्यांची वायुसेनाप्रमुखपदी नियुक्ती करून भारताने चीनला योग्य तो इशारा दिलेला आहे, असा दावा केला जातो.

leave a reply