लडाखच्या सीमेवर वायुसेनेच्या हालचाली वाढल्या

नवी दिल्ली – लडाखच्या सीमेवर भारतीय वायुसेनेची सुखोई ३०-एमकेआय, मिग २९ ही लढाऊ विमाने व अपाचे हेलिकॉप्टर्स घिरट्या घालत असून अवघड लष्करी वाहतुक करणारे सी-१७, आयएल-७६ ही विमाने भारतीय सैनिकांना आवश्यक ते साहित्य जलदगतीने पुरवित आहेत. दोन्ही देशांमध्ये तणाव वाढेल, अशा हालचाली कोणीही करू नये, असे आवाहन चीनकडून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र यावेळी, भारत चीनच्या बिनशर्त माघारीखेरीज दुसरी कुठलीही तडजोड करणार नसल्याचे सज्जड इशारे भारताकडून दिले जात आहेत. भारताची आक्रमकता पाहता, चीन जितका काळ भारताच्या सीमेजवळील तैनाती कायम ठेवील, तितक्याच प्रमाणात चीनला मानहानी सहन करावी लागेल, असे दावे भारताचे माजी वरिष्ठ अधिकारी तसेच विश्लेषक करू लागले आहेत.

Ladakhगलवान व्हॅलीतील संघर्षानंतर चीनने आपल्या सीमाभागात लढाऊ विमानांच्या हालचाली सुरू कल्या होत्या. याद्वारे युद्धाला तोंड फुटेल, अशी धमकी देण्याचा प्रयत्न चीनने केला होता. त्यानंतर भारताने चीनलगतच्या सर्वच सीमेवरील आपले वायुतळ कार्यान्वित केले. गेल्या काही दिवसांपासून लडाख क्षेत्रात वायुसेनेच्या हालचाली मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. शनिवारी वायुसेनेच्या या हालचालींची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढल्याची नोंद माध्यमांनी केली आहे. वायुसेनेची विमाने व संसाधने इथल्या सीमेवर तैनात करण्यात आली असून कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असे वायुसेनेच्या विंग कमांडरांनी म्हटले अहे. त्याचवेळी पँगॉन्ग त्सो सरोवरात नौदलाच्या स्पीडबोट्स तैनात करण्यात येत आहेत. भारताची ही तयारी चीनच्या चिंता वाढवित असल्याचे संकेत मिळत आहेत.

आधीच्या काळात भारताला धमक्या देणारा व सीमावादात ताठर भुमिका स्वीकारणार चीन आता सीमेवरील तणाव वाढवू नका, असे आवाहन भारताला करीत आहे. त्याचवेळी द्वीपक्षीय सहकार्य दोन्ही देशांच्या हिताचे आहे, याचीही जाणीव चीनला या निमिताने झाल्याचे दिसू लागले आहे. असे असले तरी, चीन सीमाभागातून माघार घ्यायला मात्र तयार नाही. पण जितका काळ चीन सीमाक्षेत्रातून माघार घेणार नाही, तितक्याच अधिक प्रमाणात इथे चीनला मानहानी सोसावी लागेल, असे भारतीय विश्लेषक बजावित आहेत. चिनी लष्कराच्या भ्याड हल्ल्यात भारताचे २० सैनिक शहीद झाल्यानंतर खवळलेल्या भारताने चीनच्या विरोधात सुरू केलेल्या लष्करी, आर्थिक व राजनैतिक आघाड्यांवरील कारवायांना आंतरराष्ट्रीय समुदायाचा सक्रिय पाठिंबा मिळत आहे. ही बाब चीनला अधिकच अस्वस्थ करणारी ठरते.

हा सीमावाद व त्यातून भडकणारा संघर्ष या क्षेत्रापुरता मर्यादित रहाणार नाही तर हिंदी महासागर क्षेत्रापर्यंत याचे पडसाद उमटतील, हा संदेश भारताकडून वेगवेगळ्या मार्गाने चीनपर्यंत पोहोचविला जात आहे. अंदमान-निकोबार द्विपसमूहावर भारतीय नौदल अधिकाधिक तैनाती वाढवित असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. हिंदी महासागर क्षेत्रात मोठ्या संख्येने चीनची जहाजे वावरत असल्याच्या बातम्या येत असताना, नौदलाची ही तैनाती लक्षवेधी ठरते. या पार्श्वभूमीवर चीनने लडाखच्या सीमाभागात भारतावर कुरघोडी करण्याचा विचार सोडून द्यावा व इथून बिनशर्त माघार घ्यावी, असा परखड सल्ला भारतीय विश्लेषक चीनला देऊ लागले आहेत. तर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासाठी भारताबरोबरील सीमावाद हा आता प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे, हे चिनी विश्लेषकही मान्य करू लागले आहेत. याद्वारे या सीमावादाचा चीनच्या अंतर्गत राजकारणावरही फार मोठा प्रभाव पडत असल्याची कबुली चिनी विश्लेषकांनी दिली आहे.

leave a reply